Join us

अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचा मृत्यू

By admin | Updated: January 2, 2017 06:58 IST

अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचा शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास, ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला.

मुंबई : अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजने यांचा शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास, ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. भोजने हे अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालयात कार्यरत होते.१० डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील वायरमध्ये ससाणा अडकला होता. त्याची सुटका करताना लागलेल्या विजेच्या झटक्यात, राजेंद्र भोजने यांच्यासह संजय काळभेरे आणि दिनेश सुबनकर हे तीन अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले होते. या तिघांनाही उपचारार्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. भोजने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोन अग्निशमन दलाचे जवान ७० टक्के भाजले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत.भोजने यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव ताब्यात घेण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला होता. शिवाय भोजने यांना शहिदाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही केली होती. मात्र, भोजने यांच्या कुटुंबीयांच्या मागणीची कोणतीही दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. राजेंद्र भोजने यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारापूर्वी भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात त्यांना मानवंदना देण्यात आली. (प्रतिनिधी)