Join us
Daily Top 2Weekly Top 5

पवई लेक होमला अग्निशमन दलाची नोटीस

By admin | Updated: June 9, 2015 01:55 IST

त्रुटी आढळून आल्यामुळे इमारतीच्या सोसायटीला अग्निशमन दलाकडून नोटीस बजाविण्यात आली आहे़ हा चौकशी अहवाल उद्यापर्यंत सादर होणार आहे़

मुंबई : पवई लेक होम येथील इमारतीमधील अग्निरोधक यंत्रे कार्यान्वित असतानाही रहिवाशांनी त्याचा वापर का केला नाही? गच्चीच्या दाराला असलेले टाळे आणि इमारतीच्या आवारातील पार्किंगमुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला़ या सर्व त्रुटी आढळून आल्यामुळे इमारतीच्या सोसायटीला अग्निशमन दलाकडून नोटीस बजाविण्यात आली आहे़ हा चौकशी अहवाल उद्यापर्यंत सादर होणार आहे़ चांदिवली येथील पवई लेक होम या २१ मजली इमारतीला शनिवारी लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला़, तर १८ रहिवासी जखमी झाले आहेत़ जखमींवर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ १४ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या वातानुकूलन यंत्राने पेट घेतल्यामुळे आगीचा भडका उडाला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे उद्या सादर होणाऱ्या या चौकशी अहवालातून या दुर्घटनेचे कारण स्पष्ट होणार आहे़़ त्यानुसारच पुढील कारवाई निश्चित होणार आहे़या इमारतीमधील फायर हायड्रेण्ट्सचा वापर अग्निशमन दलास आग विझविण्यासाठी करता आला़ इमारतीतील वायरिंगचे डॅक्ट उघडे होते़ गच्चीला टाळे लावले असल्याने ते तोडावे लागले़ इमारतीमधील प्रवेश व आपत्कालीन मार्गाचा नकाशा लावण्यात आला नव्हता़ तसेच इमारतीच्या आवारातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे मदतकार्यातील मोलाचा वेळ वाया गेला़ तसेच अलार्म बंद होते़ त्यानुसार इमारतीला नोटीस बजाविण्यात आली असून पुढील कारवाई अहवालानंतर होईल, असे अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)