Join us  

Fire In Mumbai: ‘अविघ्न’वर आगीचे विघ्न; प्राण वाचविण्यासाठी १९व्या मजल्यावरून मारली उडी; पण जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 8:14 AM

एका मजल्यावर फर्निचरचे काम सुरू असताना उडालेल्या ठिणगीमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई : करीरोड येथील वन अविघ्न पार्क या निवासी गगनचुंबी इमारतीला शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास आग लागली. आगीतून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी एकोणिसाव्या मजल्यावरून उडी मारलेल्या अरुण तिवारी (३०) या सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही इमारत तळ मजला अधिक साठ मजली आहे. लालबाग, करीरोड परिसरातील एक प्रशस्त इमारत आहे. 

एका मजल्यावर फर्निचरचे काम सुरू असताना उडालेल्या ठिणगीमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याची चौकशी सुरू आहे. परळ येथील (पान १ वरून) केईएम रुग्णालयात अरुण याला दाखल केले.  रुग्णालय प्रशासनाने त्याला मृत घोषित केले. करी रोड येथील इमारतीमधील आगीच्या दुर्घटनेमुळे गगनचुंबी इमारतींच्या अग्नी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.अविघ्न पार्क इमारतीच्या एकोणिसाव्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने चौदा फायर इंजिन, नऊ जेटी, एक कंट्रोल पोस्टसह अत्याधुनिक साहित्याने सज्ज असलेली वाहने पाठविली. विशेषत: गगनचुंबी इमारतीला लागलेली आग शमविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडून ९० मीटरपर्यंत पोहोचणाऱ्या उंच शिडीचादेखील वापर करण्यात आला.आग शमविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच इमारतीमध्ये वास्तव्य करत असलेल्या रहिवाशांना सुखरूप इमारतीमधून खाली उतरविण्यात आले. सर्वप्रथम इमारत रिकामी करण्यात आली. आग शमविण्याचे काम सुरू असतानाच एकोणिसाव्या मजल्यावर अडकलेला सुरक्षा रक्षक अरुण तिवारी हा मात्र आपले प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करत होता. आगीच्या ज्वाला आणि धूर यामुळे त्याला एकोणिसाव्या मजल्यावरून स्वत:ची सुटका करून घेता येत नव्हती. अखेर एकोणिसाव्या मजल्यावर अडकलेल्या आणि जीव कासावीस झालेल्या अरुण यांनी एकोणिसाव्या मजल्यावरून लोंबकळत खाली येण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनी खाली उडी मारली आणि त्यात त्यांचा जीव गेला.दुपारी पावणेतीन वाजता येथील आग नियंत्रणात आली असली तरी इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढतानाच येथील कामगारांनादेखील सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.  करी रोड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला होता. येथील परिसरात अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्या आणि महापालिकेच्या गाड्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि पालिकेचे अधिकाऱ्यांमुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. दोषींवर कठोर कारवाई करणार - अस्लम शेखअविघ्न पार्क इमारत दुर्घटनेची मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गंभीर दखल घेतली आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात-कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.मंत्री अस्लम शेख म्हणाले,  प्रत्येक इमारत प्रशासनाला यापुढे अग्नी सुरक्षा अहवाल दर सहा महिन्यांनी पालिकेला सादर करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. उंच इमारतीमधील सुरक्षा रक्षकांनादेखील अग्नी सुरक्षाविषयक प्रशिक्षण घेणे अनिवार्य करण्यात येणार आहे. इमारतींमधील अग्नी सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने अग्निशमन विभाग व संबंधित अन्य विभागांसोबत लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.विकासकामांसंदर्भात तक्रार इमारतीतील रहिवाशांनी विकासकामांसंदर्भात तक्रार केली आहे की, सोसायटी रहिवाशांकडे हस्तांतरीत न केल्यामुळे बरीच कामे प्रलंबित असून, यामुळे ही आगीची घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या तक्रारीबाबत योग्य ती चौकशी करून प्रशासनाने आवश्यक कारवाईचे निर्देश महापौरांनी दिले.वन अविघ्न पार्क ही तळमजला अधिक ६० अशी बहुमजली इमारत आहे.

दुपारी ११.४५ वाजता इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शुक्रवारी आग लागली. 

४० वाहने तैनात १४ फायर इंजिन, ९ जम्बो टँकर, १ नियंत्रण कक्ष वाहन, ९० मीटर उंचीची १ आणि ५५ मीटर उंचीची १ अशा २ शिडी आदी मिळून सुमारे ४० वाहने घटनास्थळी तैनात होती.

दुपारी ३.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळविले.

४.५८ वाजता आग पूर्णपणे शमली.

अग्निशमन दलाने इमारतीतून १६ नागरिकांची सुखरुप सुटका केली.