Join us  

‘आरपीएफ’ अधिका-याविरुद्ध रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल, फेरीवाला मारहाण प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 3:00 AM

फेरीवाल्याला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक जयपाल सिंह आणि हवालदार इम्रान काजी यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई : फेरीवाल्याला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक जयपाल सिंह आणि हवालदार इम्रान काजी यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ गेली १२-१५ वर्षे असफाक जमील खान हे शर्ट आणि टॉप विक्रीचा व्यवसाय करतात. ७ जून २०१७ रोजी दुपारी १च्या सुमारास असफाक यांना आरपीएफचे जयपाल सिंह आणि इम्रान काजी यांनी आरपीएफ सीएसएमटी लोकल स्टेशनच्या कार्यालयात नेऊन बंदुकीच्या दस्त्याने मारहाण केली. शिवाय ‘एके-४७’ दाखवत जीवे मारण्याची भीती दाखवली, अशी तक्रार असफाक यांनी २३ जानेवारी २०१८ रोजी सीएसएमटी रेल्वे पोलीस स्थानकात दाखल केली. घाबरल्यामुळे मारहाण झाल्यानंतर आपण गावी निघून गेलो होतो. मात्र गावावरून आल्यावर तक्रार दाखल केली, असेही असफाक यांनी सांगितले. त्यानंतर २ फेब्रुवारी २०१८ रोजी खान यांचा जबाब नोंदविण्यात आला. या प्रकरणात मंगळवारी पुन्हा जबाब नोंदवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.या प्रकरणी घटना घडल्यानंतर जुलै २०१७मध्ये तत्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. फेरीवाला मारहाणप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक जयपाल सिंह आणि हवालदार इम्रान काजी यांच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे, असे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले.सीसीटीव्हीत अशी कैद झाली घटनाफूटेज १ - इमरान काजी फेरीवाल्याच्या कॉलरला पकडून मारहाण करत आहेत.रेल्वे सुरक्षा बल उपनिरीक्षक जे.पी. सिंह आणि इमरान काजी हे फेरीवाल्याला कोणत्याही तक्रारीशिवाय मारहाण करत असताना वरिष्ठ अधिकारी डी.व्ही. सिंह कार्यालयात उपस्थित होते.फूटेज २ - त्यांनी फेरीवाल्याला मारहाण करून धक्का देत जमिनीवर पाडले.फूटेज ३, ४, ५, ६ - उपनिरीक्षक जे.पी. सिंह आणि इमरान काजी यांनी फेरीवाल्याला मारहाण केली. सुमारे अडीच तास फेरीवाल्याला कार्यालयात बसवून ठेवले.

फूटेजनुसार पोलीस दोषीवैद्यकीय तपासणीसाठी नेल्यानंतर संबंधित फेरीवाल्याला गंभीर मारहाण झाल्याच्या माहितीला डॉक्टरांनी दुजोरा दिल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही फूटेजनुसार जे.पी. सिंह आणि इम्रान काजी दोषी असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी दिली.

टॅग्स :गुन्हा