Join us  

बांधकाम कामगारांना मिळणार आर्थिक मदत; नोंदणी केली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 10:48 AM

कामगारांच्या सुरक्षेकरिता तरतुदींची अंमलबजावणी गरजेची.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणात खासगी व शासकीय बांधकामाचे प्रकल्प सुरू आहेत. या बांधकामांच्या साइटवर अपघाताची शक्यता असल्याने आस्थापना मालक, बिल्डर, तसेच कंत्राटदार यांनी बांधकाम कामगारांच्या सुरक्षेकरिता सर्व तरतुदींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

असे केल्यास बांधकामाच्या ठिकाणी होणारे अपघात टाळता येतील. त्यामुळे कामगार उप- आयुक्त यांच्याकडून आस्थापना नोंदणी, बांधकाम कामगार नोंदणी व बांधकाम कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहर कार्यालयामार्फत एकूण ३९ हजार २०७ नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संच देण्यात आले

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई शहर कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण करण्यात येते; तसेच त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो.

नोंदणीसाठी बांधकाम कामगाराचे वय १८ ते ६० असावे. त्याने मागील वर्षभरात किमान ९० दिवस बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे.

३९ हजार ६९७ एवढी नोंदणी :  कामगार उप-आयुक्त, मुंबई शहर कामगार ३९ हजार ६९७ इतकी एकूण नोंदणी करण्यात आली आहे.

सुरक्षा संचामध्ये काय? 

सुरक्षा संचामध्ये प्रोटेक्टिव शूज, हेअरिंग प्रोटेक्शन, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी हार्नेस, मास्क, रिफलेक्टिव जॅकेट, तसेच अत्यावश्यक संचामध्ये सोजर टॉर्च, मॉस्कीटो नेट, प्लास्टिक मॅट, टिफिन बॉक्स, आउटर बॅग, वॉटर बॉटल, गॅल्वनाइज ट्रक इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

२ हजार ९४ लाभार्थी :  मंडळामार्फत नव्याने गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजना लागू करण्यात आल्याने या योजनेअंतर्गत एकूण दोन हजार ९४ लाभार्थीना गृहपयोगी वस्तूंचा संच देण्यात आला आहे

येथे करा नोंदणी -

१) बांधकाम कामगार ऑनलाइन पद्धतीने www.mahabocw.in या संकेतस्थळावर नोंदणी नूतनीकरण व लाभासाठी अर्ज करू शकतात.

२) बांधकाम कामगाराने लाभाचा अर्ज संकेतस्थळावर सादर केल्यावर दिनांक निवडून त्या दिवशी उपस्थित राहून मूळ कागदपत्रांच्या तपासणीअंती लाभ मंजूर करता येतात.

३) मंडळामार्फत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सुरक्षा व आरोग्य साहाय्याच्या योजना राबविण्यात येतात.

टॅग्स :मुंबई