Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नऊ लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:04 IST

कामगार मंत्री हसन मुश्रीफ; १३७ कोटी ६१ लाख रुपये मजुरांच्या खात्यात जमालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ...

कामगार मंत्री हसन मुश्रीफ; १३७ कोटी ६१ लाख रुपये मजुरांच्या खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृती सक्रिय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार नऊ लाख १७ हजार बांधकाम कामगारांना मदत करण्यात आली आहे.

गेल्या चार दिवसांत १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात झाला जमा केला आहे, असे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी सांगितले.

गेल्या वर्षीही कोविड -१९ या विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजारांची मदत करण्यात आली होती. सध्या राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे इमारत व इतर बांधकामे तसेच इतर कामगार वर्गाची कामे पूर्ववत सुरू झालेली नसल्याने कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदणीकृत कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी सुरू असून कार्यवाहीचे निर्देश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास दिल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली.

दरम्यान, नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची योजना मंडळाकडून राबविण्यात येत असून, आतापर्यंत दोन लक्ष तीन हजार कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.