नवी मुंबई : रबाळे रेल्वे स्थानकालगतच रबाळे पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरु होते. बांधकाम पूर्ण झाल्याने रविवारी या पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त, उपआयुक्त यांच्यासह राजकीय मंडळींनीही त्या ठिकाणी भेट दिली.रबाळे पोलीस ठाणे हद्दीत ऐरोली, रबाळे, तळवली, गोठीवली व घणसोलीचा काही भाग येतो. यापूर्वी हे रहिवासी क्षेत्राबाहेर ठाणे बेलापूर मार्गालगत पूर्व बाजूला होते. परंतु पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यक्षेत्राचा भाग हा मार्गाच्या पश्चिमेला होता. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव नागरिकांना पोलीस ठाण्यात जायचे असल्यास प्रवासाचा नाहक त्रास सहन करावा लागायचा. शिवाय पोलिसांनाही तेवढीच पायपीट करावी लागायची. अशीच परिस्थिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या संदर्भात होती. त्यामुळे रबाळे पोलीस ठाण्याच्या जागेत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे सुरु करण्यात आले होते. तर रबाळे पोलीस ठाण्याकरिता रबाळे रेल्वे स्थानकालगत नव्या पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरु होते. हे बांधकाम सुरु असतानाच नागरिकांच्या सोयीसाठी तेथूनच कार्यभार सांभाळला जात होता. अखेरीस नुकतेच बांधकाम पूर्ण झाल्याने या पोलीस ठाण्याचे औपचारिक उद्घाटन रविवारी करण्यात आले.याप्रसंगी पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद, अप्पर पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील, गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे, परिमंडळ उपआयुक्त शहाजी उमाप, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण वालतुरे यांच्यासह सर्वच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय अनेक राजकीय मंडळींनी देखील तेथे उपस्थित राहून पोलिसांना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)
अखेर रबाळे पोलीस ठाण्याचे उद्घाटन
By admin | Updated: September 8, 2014 00:15 IST