मुंबई : अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांना क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, अॅथलेटिक्स या खेळांच्या सरावासाठी दुपारी ३.३० नंतर कार्यालय सोडण्याची सवलत देण्याचे आदेश राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने दिले आहेत.शासनाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना सरकारी नोकरीत घेतले. त्यानंतर या खेळाडूंना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्याने सरावासाठी वेळ मिळत नसल्याने सराव थांबला आहे, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. आता क्रीडा विभागाने काढलेल्या आदेशामुळे क्रीडापटूंना सरावाकरिता संधी उपलब्ध झाली आहे. ही सवलत केवळ सचिवालय जिमखान्याच्या खेळाडूंना दिलेली आहे. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी व अॅथलेटिक्स या खेळांसाठी राज्याच्या संघात निवड झालेल्या स्पर्धकांना द्यायच्या सवलतीचा कालावधी सचिवालय जिमखान्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे. स्पर्धकाने सराव कालावधीत प्रत्यक्ष सरावस्थळी उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र स्पर्धापूर्व सराव आयोजक यांच्याकडून घेऊन त्यांचे आस्थापना अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक राहील.
अखेर खेळाडूंना मिळाली सरावाची संधी
By admin | Updated: September 24, 2015 02:16 IST