Join us

अखेर ब्रॅण्डन गोन्सालवीस हत्येची फाइल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:07 IST

आरेतील हत्या प्रकरण : चार वर्षांच्या तपासानंतर ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: आरेमध्ये निर्घृण हत्या करण्यात आलेल्या ...

आरेतील हत्या प्रकरण : चार वर्षांच्या तपासानंतर ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: आरेमध्ये निर्घृण हत्या करण्यात आलेल्या ब्रॅण्डन गोन्सालवीस (२२) याच्या मारेकऱ्यांना शोधण्यात मुंबई पोलीस अपयशी ठरले. त्यानुसार याप्रकरणी ‘क्लोजर रिपाेर्ट’ न्यायालयात सादर करण्यात आल्याने खळबळजनक अशा या हत्येचे आरोपी आणि त्यामागचे कारण आता कधीच पुढे येऊ शकणार नाही.

गोन्सालवीस हा १९ डिसेंबर २०१६ रोजी त्याच्या दिंडोशी येथील घरातून बेपत्ता झाला होता. त्यानंतर आरेच्या जंगल परिसरात डोके धडावेगळे केलेला त्याचा मृतदेह आढळला हाेता. त्याच्या मृतदेहाजवळ पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य सापडले होते. मुख्य म्हणजे त्याने एक चित्र त्याच्या वहीत काढले होते ज्यात बळी देण्याची प्रक्रिया रेखाटण्यात आली होती. तसेच त्याच्या अंगावरही काही विशेष प्रकारचे टॅटू गोंदविण्यात आले होते.

त्याचा बळी दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. खासगी वैमनस्य, प्रेम प्रकरण, बळी, संपत्तीचा वाद, दरोडा या सर्व बाजूंनी परिमंडळ बाराचे विशेष पथक, तसेच क्राइम ब्रँचही चौकशी करत होती. ज्यात चर्चचे फादर, मांत्रिक, अभिलेखावरील गुन्हेगार, मित्र, नातेवाईक अशा हजारो लोकांची चौकशी करण्यात आली; मात्र त्यांच्या हाती काहीच पुरावा लागला नाही. जवळपास चार वर्षे या प्रकरणाला होऊन गेली तरी मारेकऱ्यांबाबत कोणताही सुगावा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे ही फाइल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

....................................