Join us

अखेर जलपुनर्प्रक्रिया सक्तीची अट शिथिल

By admin | Updated: December 17, 2014 01:52 IST

पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रियेचा प्रकल्प सर्व निवासी सोसायट्यांना सक्तीचा करण्याची अट

मुंबई : पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रियेचा प्रकल्प सर्व निवासी सोसायट्यांना सक्तीचा करण्याची अट अखेर शिथिल करण्यात येणार आहे़ प्रस्तावित इमारतींना हा प्रकल्प सक्तीचा असून, जुन्या इमारतींना यात सूट देण्यात आली आहे़ पुरेशी जागा असलेल्या सोसायट्यांनाच हा प्रकल्प उभारावा लागणार आहे़ हे धोरण पुढच्या महिन्यात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत येणार आहे़डोंगराळ भागात अथवा झोपडपट्ट्यांमध्ये थेंब थेंब पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असताना मुंबईतील काही भागांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याचे अपव्यय होत आहे़ कपडे, लादी, भांडी धुणे यासारख्या कामांवर ६० टक्के पाणी वाया जात असल्याने वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रियेचा प्रकल्प पालिकेमार्फत सक्तीचा करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी चर्चेत आला़ या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेची निवड करण्यात आली होती़ या संस्थेने आपला अहवाल पालिकेला सादर केला आहे़ निवासी सोसायट्यांनी असा प्रकल्प उभारल्यास १० टक्के पाण्याची बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे़ मात्र जागेच्या टंचाईचे कारण अनेक सोसायट्यांमधून पुढे आल्यानंतर निवासी सोसायट्यांना सक्ती करण्याच्या निर्णयात बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ या धोरणाला अंतिम स्वरूप देऊन पुढच्या महिन्यात गटनेत्यांच्या बैठकीत आणण्याची तयारी प्रशासनामार्फत सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)