Join us

अखेर ‘त्या’ डॉक्टरचे निलंबन, दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 02:09 IST

महापालिकेच्या ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये रुग्णालयाचा हलगर्जीपणा आणि अपु-या स्टाफमुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला होता.

मुंबई : महापालिकेच्या ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये रुग्णालयाचा हलगर्जीपणा आणि अपु-या स्टाफमुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ‘लोकमत’ने २१ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. यासंदर्भाम के-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष आणि वॉर्ड क्रमांक ६०चे नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसरकर, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर, डॉ. कांचन कुमका यांची बैठक घेत ओशिवरा मॅटर्निटी होमच्या डॉ. माधुरी कांबळे यांचे निलंबन, तसेच या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पालिका प्रशासनाला दिले.ओशिवरा, आदर्श नगर येथे राहणाºया ३० वर्षीय निखत मलिक यांना १२ फेब्रुवारीला ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांचा वेळकाढूपणा आणि भोंगळ कारभारामुळे निखत यांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. परिणामी बाळाची पल्स रेट कमी झाली. ओशिवरा मॅटर्निटी होममध्ये रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण निखत आणि नातेवाईक मोहम्मद आरिफ यांचा दीड तास वाया गेला. निखत यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी रुग्णाचे नातेवाईक मोहम्मद आरिफ तसेच स्थानिक नागरिकांनी योगिराज दाभाडकर यांची भेट घेत दोषी डॉक्टरांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, आमदार भारती लव्हेकर यांनी सांगितले की, मॅटर्निटी होम १५० खाटांचे करावे, जनरल ओपीडी आणि नर्सिंग होम अद्ययावत करून येथे पुरेसा स्टाफ, टेक्निशिअनची भरती करावी या मागणीसाठी मी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे दाद मागितली आहे. मॅटर्निटी होममधील जनरल ओपीडी, नर्सिंग होम अद्ययावत करून टेक्निशिअन स्टाफची लवकरच भरती करण्यात येऊन रुग्णालयाचा कायापालट केला जाईल, असे आश्वासन आयुक्त मेहता यांनी दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.