मुंबई: बोरीवलीच्या सुकरवाडीमध्ये महिलेच्या घरात शिरून हल्ला करणाऱ्या माकडाचा हैदोस अजूनही सुरूच आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
सुकरवाडीमध्ये विठ्ठल पटेल चाळीत मुलगा आणि पतीसोबत राहणाऱ्या रजनी रवींद्र टी(५५) या महिलेवर १३ जुलै रोजी माकडाने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले होते. माकड त्यांच्या घरातून निघून जरी गेले तरी त्यानंतर त्याने आसपासच्या परिसरातही असाच हैदोस घातला. त्यामुळे स्थानिकांमध्ये अजूनही दहशतीचे वातावरण असून त्याला लवकरात लवकर पकडून कैद करावे आणि लोकांचा जीव वाचवावा, अशी विनंती स्थानिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर वन विभागाने सुकरवाडी परिसरात माकडाला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.
रजनी यांना माकड चावल्यानंतर त्यांच्यावर उपचारादरम्यान अद्याप सात इंजेक्शन देण्यात आली असून, त्यात चारही जखम झालेल्या भागातच दिली गेलीत. त्यामुळे त्यांच्या दोन्ही हाताने त्यांना काहीच काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे या महिलेला मदत करण्याची विनंतीही स्थानिक करत आहेत. दरम्यान, जोपर्यंत माकड पकडले जात नाही तोपर्यंत ही दहशत मात्र कायम बोरीवलीकरांमध्ये राहणार आहे.
खासदारांकडून मदतीचे आश्वासन
'नॅशनल पार्क बंद केल्यापासून उपाशी माकड लोकवस्ती असलेल्या भागात येऊ लागली आहेत. अन्यथा पूर्वी जॉगिंगला जाणारे माकडांना खाऊ घालायचे, त्यामुळे ते जंगल सोडून बाहेर येत नव्हते. सुकरवाडीत महिलेवर झालेला माकडाचा हल्ला हा गंभीर प्रकार असून माझ्याकडून सदर कुटुंबाला योग्य ती मदत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
- गोपाळ शेट्टी, खासदार, बोरीवली.