Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर म्हाडाची मास्टर लिस्ट जाहीर

By admin | Updated: October 2, 2015 01:25 IST

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या रहिवाशांना म्हाडाने दिलासा दिला आहे

मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या रहिवाशांना म्हाडाने दिलासा दिला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली ३२३ पात्र रहिवाशांची मास्टर लिस्ट अखेर गुरुवारी म्हाडाने जाहीर केली आहे. यामध्ये तब्बल ४५ वर्षांपासून संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या अनेक रहिवाशांना हक्काचे घर मिळाले आहे. यामध्ये ७0 रहिवाशांना त्यांनी पसंती दर्शविलेल्या विभागातच घर मिळाले आहे.संक्रमण शिबिरात राहत असलेल्या नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत मास्टर लिस्ट तयार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ३२३ पात्र रहिवाशांची पात्रता यादी जाहीर करण्याचे काम सुरू असतानाच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामुळे मास्टर लिस्ट लांबणीवर गेली होती. अखेर आर आर मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे यांनी मास्टर लिस्टचा प्रश्न मार्गी लावला आहे. सेसप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी तेथील नागरिकांना संक्रमण शिबिरात पाठविण्यात येते. त्यानुसार मुंबईतील अनेक सेसप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासावेळी अनेक रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठविण्यात आले आहे. या रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडामार्फत २0१३ गाळे वितरणासाठी अर्ज मागविण्यात आले. या अर्जाची छाननी आणि सुनावणी घेऊन रहिवाशांना पात्र-अपात्र ठरविण्यात आले. त्यानुसार २0१४ मध्ये पात्र-अपात्र अर्जदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली. यानंतर हरकती, सूचना मागविल्यानंतर त्याची सुनावणी घेऊन म्हाडाने ३२३ अर्जदारांना गाळे वितरणासाठी पात्र ठरविले आहे.पात्र अर्जदारांची गाळे वितरणाची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामधील अर्जदारांना देकारपत्र टपालाद्वारे पाठविण्यात येणार आहे. तसेच ९३४ अपात्र अर्जदारांची यादी अपात्र होण्याच्या कारणासह प्रसिद्ध करण्यात येत आहे. २४0 अर्जदारांबाबत छाननीची प्रक्रिया सुरू असून बृहतसूची समितीमार्फत त्यांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय घेण्यात येणार आहे.गाळे वितरित केल्यानंतर पात्र अर्जदाराने म्हाडाकडे सादर केलेली कागदपत्रे बनावट आढळल्यास अशा अर्जदारांना वितरित करण्यात आलेल्या गाळ्याचे वितरण रद्द करण्याचा इशाराही म्हाडाने दिला आहे. तसेच अशा अर्जदारांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही म्हाडाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)