मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५४व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेचा अंतिम कार्यक्रम जाहीर झाला आहे. १६ फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार असून, ती १३ मार्चपर्यंत चालणार आहे. राज्यातील १९ आणि गोव्याच्या २ अशा एकूण २१ नाटकांचे सादरीकरण या स्पर्धेत होणार आहे.हौशी रंगकर्मींना हक्काचा रंगमंच उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा गेल्या ५४ वर्षांपासून घेण्यात येते. राज्यभरात वेगवेगळ्या केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीतून सुमारे २७५ नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या २१ नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातल्या सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यात महत्त्वाचे केंद्र म्हणून स्थान मिळविलेल्या पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही स्पर्धा रंगेल. बहुतांश नाटकांचे प्रयोग सायंकाळी ७ वाजता होणार असून, ४ प्रयोग सकाळी ११.३० वाजता होणार आहेत. या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकांचे प्रयोग बघण्याची संधी पनवेलकरांना पहिल्यांदाच मिळणार आहे.या स्पर्धेत १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वर्ध्याच्या अध्ययन भारती निर्मित ‘दाभोळकरांचं भूत’ हे नाटक सादर होईल. १७ तारखेला अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे ‘मस्तानी’ हे नाटक सायंकाळी ७ वाजता सादर होणार असून, १८ फेब्रुवारी रोजी पुण्याच्या आमचे आम्ही या संस्थेचे ‘रानभैरी’ हे नाटक सादर होईल. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता नागपूरचे अंकुर मानव समाज उत्थान केंद्र ‘विठाबाई’ या नाटकाचा प्रयोग सादर करेल. २० फेब्रुवारी रोजी मुंबईतील बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाचे ‘हार्दिक आमंत्रण’, २३ रोजी पुण्याच्या ध्यासचे ‘परवाना’, २४ तारखेला नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे ‘न हि वैरेन वैरानि’, २५ फेब्रुवारी रोजी कल्याणच्या मिती-चारचे ‘शनिवार-रविवार’ आणि २६ तारखेला चंद्रपूरच्या नवोदिताचे ‘ध्यानीमनी’ या नाटकांचे प्रयोग सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्य विभागाचे ‘पेर्इंग गेस्ट’ हे नाटक २८ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता सादर होईल.२ मार्चला कोल्हापूरच्या प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्राचे ‘क्राईम अॅण्ड पनिशमेंट’, ३ मार्चला परभणीच्या राजीव गांधी युवा फोरमचे ‘सहज सुचलं म्हणून’, ४ मार्च रोजी पणजीच्या रुद्रेश्वर संस्थेचे ‘महाप्रस्थान’, ५ मार्चला रत्नागिरीच्या संकल्प कलामंचचे ‘प्यादी’ आणि ६ मार्चला सांगलीच्या सांस्कृतिक कलामंचचे ‘एक चादर मैलीसी’ या नाटकांचे प्रयोग सायंकाळी ७ वाजता होणार आहेत. ७ मार्च रोजी गोव्याच्या श्री थिएटर्सचे ‘गुरू’ हे नाटक सकाळी ११.३० वाजता सादर होईल. ९ मार्च रोजी जळगावच्या ऊर्जा फाउंडेशनचे ‘अपूर्णांक’ सायंकाळी ७ वाजता, तर १० मार्च रोजी मुंबईच्या युटोपिया कम्युनिकेशन्सच्या ‘ती’ या नाटकाचे सादरीकरण ११.३० वाजता होणार आहे. सोलापूरच्या विकास वाचनालयाच्या ‘इस्कॅलॅवो’चे सादरीकरण ११ मार्च रोजी, मुंबईच्या विघ्नहर्ता सेवा संघाच्या ‘प्यादी’चे सादरीकरण १२ मार्च रोजी आणि अहमदनगरच्या वात्सल्य प्रतिष्ठानच्या ‘स्मशानयोगी’ नाटक सायंकाळी ७ वाजता होणार आहे. नवे विषय, नव्या संहिता, जुन्या गाजलेल्या नाटकांचा वेगळा आविष्कार, महाविद्यालयीन रंगभूमीवरून आलेले युवा रंगकर्मी, व्यावसायिक, प्रायोगिक रंगभूमीवरील महत्त्वाच्या रंगकर्मींचे स्पर्धेत सहभागी असणे हे यंदाचे ठळक वैशिष्ट्य आहे. च्राज्यभरात वेगवेगळ्या केंद्रांवर झालेल्या प्राथमिक फेरीतून २७५ नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या २१ नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहेच्मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी जिल्ह्यांशी रस्ते तसेच रेल्वेमुळे पनवेल थेट जोडलेले असल्यामुळे हौशी प्रेक्षकांचाही स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा.
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी १६ फेब्रुवारीपासून
By admin | Updated: January 31, 2015 22:32 IST