Join us  

अंतिम सत्राच्या परीक्षा अखेर रद्दच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 3:36 AM

व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा रद्दच्या निर्णयाला शिखर संस्थांची मंजुरी बाकी

मुंबई : अखेर अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा यंदा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केला. अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (बीए, बीकॉम, बीएससी) परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी व्यावसायिक परीक्षा (अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, आर्किटेक्चर, अध्यापनशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, विधि, प्लॅनिंग, व्यवस्थापन शास्त्र, संगणकशास्त्र, शारीरिक शिक्षण) रद्दच्या निर्णयाला त्यांच्या शिखर संस्थांची मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग त्यांना विनंती करणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन बैठकीतील निर्णयाची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी विद्यार्थी, पालकांशी शुक्रवारी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधला. राज्यात १४ सार्वजनिक विद्यापीठांत अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे ७,३४,५१६ तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे २,८३,९३७ विद्यार्थी अंतिम सत्रासाठी प्रवेशित आहेत. अंतिम सत्राच्या परीक्षार्थींचे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि एटीकेटी व बॅकलॉगचे विद्यार्थी असे तीन टप्प्यांत विभाजन केले.अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या असून जे विद्यार्थी मागील सत्रात उत्तीर्ण आहेत, ज्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे त्यांच्याकडून लेखी अर्ज घेऊन विद्यापीठांनी योग्य सूत्र वापरून निकाल घोषित करावा, असे निर्देश दिले आहेत. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्याकडून तसे लिहून घेऊन परीक्षेची संधी देण्यात येईल. परीक्षा कधी व कशी घेता येईल यासाठी स्थानिक प्राधिकरणे व प्रशासनाशी चर्चा करून विद्यापीठांनी वेळापत्रक ठरवायचे आहे.  व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राबाबतही हेच सूत्र असेल. मात्र काही अभ्यासक्रमांच्या मुख्य अ‍ॅपेक्स बॉडी (शिखर संस्था) या दिल्लीत असल्याने त्यांची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. यासाठी विभाग संबंधित शिखर संस्थांना विनंती करेल, असे सामंत म्हणाले. या निर्णयामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला भविष्यात नोकरी, परदेशी शिक्षण व इतर कामांत अडथळा येणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.राज्यातील ४१ महाविद्यालयीन इमारती व १९८ वसतिगृहे विलगीकरण केंद्रे म्हणून अधिग्रहित केली आहेत. अनेक विद्यार्थी मूळ गावी गेले आहेत. मनुष्यबळ कमी असून संसर्गाचा धोका असल्याने परीक्षा रद्दचा निर्णय घेतल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्णय चांगला असला तरी प्रतिज्ञापत्राची अट विद्यार्थी कसे पूर्ण करणार ? आॅनलाइन असल्यास ज्या भागात इंटरनेट नाही तेथील विद्यार्थ्यांनी काय करावे ? असे प्रश्न भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.बॅकलॉग, एटीकेटीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमबॅकलॉग, एटीकेटीबाबत निर्णय न झाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. ३ लाख ४१ हजार ३०८ विद्यार्थ्यांना वाऱ्यावर का सोडले, असा सवाल माजी शिक्षणमंत्री भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. तर, अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू व अधिकारी यांच्याशी शासन स्तरावर चर्चा करून येत्या २ ते ३ दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सामंत म्हणाले.