Join us
Daily Top 2Weekly Top 5

मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील भरावाची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:07 IST

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर सातत्याने पावसाच्या पाण्याखाली जात असतानाच दुसरीकडे आरेमधील मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्रात टाकण्यात आलेल्या ...

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर सातत्याने पावसाच्या पाण्याखाली जात असतानाच दुसरीकडे आरेमधील मिठी नदीच्या पाणलोट क्षेत्रात टाकण्यात आलेल्या भरावामुळे पुराचा धोका दुपटीने वाढला. येथील भराव थांबविण्यात यावा किंवा कारवाई करण्यात यावी, म्हणून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांनी यावर आवाज उठवित तक्रारी केल्या होत्या. अखेर या तक्रारींची दखल घेण्यात आली असून,याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्याचे सेव्ह आरे मुव्हमेंट पेड लगाओ पेड बचाओ प्रोजेक्टचे ऑर्गनायजर संजीव वल्सन यांनी सांगितले.

जोगेश्वरी लिंक रोडवरील आरे मरोळ टोल नाका परिसरात भराव घालण्यात आला आहे. येथे गेल्या आठवड्यात पाहणी करण्यात आली आहे. या ठिकाणावरील पेट्रोल पंपाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र तरीही येथे भराव टाकण्यात येत आहे. आरेमधील मिठी नदीला येऊन मिळणाऱ्या नाल्यांच्या परिसरासह वनविभागाच्या सुमारे चार एकर जागेवर टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे सुमारे चाळीस फुटांचा भरावाचा डोंगर उभा आहे.

-----------------

भराव टाकलाच कसा

भराव टाकण्यात आलेली जागा वनविभागाच्या अधिपत्याखाली आहे. म्हणजे हे राखीव वने आहे. जर का ही जागा राखीव वने असेल तर येथे भराव कसा टाकला जात आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कुठे आहे भराव

जेव्हीएलआर आरेच्या मध्यभागी आहे. जेव्हीएलआरच्या एका सीमेवर हा भराव आहे. दुसरी सीमा आहे आरे कॉलनीचा मरोळ टोल नाका. तिसरी सीमा आहे गणेश मंदिर तलाव. जेथे आरे सुरु होते तेथे हा भराव आहे. जोगेश्वरीवरून आपण पवईकडे जाताना डाव्या अंगाला पूर्ण आरे आहे. प्रथमत: कारशेड लागते. त्यानंतर हा भराव येतो. कारशेडपासून ही जागा फार दूर नाही.

पूरसदृश परिस्थिती

छोटे नाले एकत्र येऊन एक मोठी नदी तयार होते. जेव्हा नदीत खूप पाणी वाहते तेव्हा त्याला वाहण्यासाठी जागा लागते. अशावेळी पाण्याला वाहण्यासाठी जागा मिळाली नाही तर हे पाणी लगतच्या परिसरात पसरते आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.तसेच मिठी नदी विमानतळाखालून वांद्र्यातून वाहते. त्यामुळे पुराचा फटका विमानतळालाही बसू शकतो.