अजित पाटील, चिरनेरमुंबई, नवी मुंबई नंतर तिसरी मुंबई म्हणून विकसित होत असलेल्या उरणमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सिडकोच्या प्लॉटवर अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. अशा इमारतींपैकी काही इमारती खचत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भविष्यात उरणमध्येही शिळफाट्यासारखी गंभीर दुर्घटना ओढवण्याची शक्यता नाकारता येत आहे. सिडकोच्या शहर विकास विभागाच्या अधिकारी मंजुळा नाईक यांनी तर उरणमधील सामाजिक कार्यकर्ते असलेल्या पत्रकारांनी लेखी तक्रार करताच अशाच प्रकारे कलंडलेल्या एका इमारतीच्या विकसकाला आणि आर्किटेक्चरला पत्र पाठवून येत्या ७ दिवसांच्या आत सिडकोचे अधिकारी, इमारतीचा विकासक आणि आर्किटेक्चर यांनी पाहणी करुन आपल्याला कळवावे, असे निर्देशच एका पत्राद्वारे दिले आहेत. त्यामुळे द्रोणागिरी नोड आणि फुंडे परिसरातील नव्याने होणाऱ्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्याखेरीज नागरिकांनी या परिसरात फ्लॅट घेताना विचार करण्याची गरज आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि समुद्र मार्गे पाऊण तासावर व प्रस्तावित रेल्वेच्या चालू असलेल्या कामाची पूर्तता झाल्यावर अवघ्या सव्वा तासाच्या अंतरावर असणाऱ्या उरणमध्ये घरासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नागरिक पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे परिसरातील नागाव, केगाव, चाणजे आदी ठिकाणांसह सिडकोच्या द्रोणागिरी आणि फुंडे नोडमध्ये घरांची बुकिंग झपाट्याने होत आहे. एखादी इमारत उभी राहण्याआधीच त्यातील सर्वच्या सर्व फ्लॅट बुक होत असल्याच्या आढळत आहेत. मात्र सिडकोच्या ज्या परिसरात या इमारती उभ्या राहत आहेत, ती संपूर्ण जमीन पूर्वी शेती आणि मिठागरांची होती. त्यावर झालेला भराव ही मोठ्या प्रमाणातील चिखल मातीचाच आहे. केवळ वरवर मुरुमाचा भराव आहे.
भरावाचा इमारतींना धोका
By admin | Updated: July 5, 2014 03:32 IST