Join us  

‘आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरा’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 12:47 AM

आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत बुधवारी आंदोलन केले.

मुंबई : आरोग्य विभागातील १५ हजार रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी करीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत बुधवारी आंदोलन केले. आझाद मैदानात या आंदोलनात हजारो गटप्रवर्तक, आशा वर्कर आणि औषध निर्माते सामील झाले होते.जन आरोग्य अभियानचे डॉ. अभिजित मोरे यांनी सरकारी रुग्णालयांतील औषधांच्या तुटवड्याकडे लक्ष वेधले. मोरे म्हणाले, सरकारी दवाखान्यांतील औषधांचा प्रचंड तुटवडा संपविण्यासाठी युद्धपातळीवर औषध खरेदी व वितरण प्रणालीमध्ये तमिळनाडू, राजस्थान या राज्यांच्या धर्तीवर आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेत तातडीने सर्व आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात यावीत. त्यासाठी सरकारी दवाखान्यांत दर्जेदार आरोग्य सेवांच्या हमीचा कायदा करण्याची गरजही मोरे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे एम. ए. पाटील यांनी ‘आशां’ना इतर राज्यांप्रमाणे नियमित व निश्चित मानधन देण्याची मागणी केली. पाटील म्हणाले, राज्यातील आशांना कोणत्याही प्रकारचे नियमित किंवा निश्चित मानधन मिळत नाही, हे दुर्दैव आहे.>आरोग्याचे बजेट वाढवा!राज्याच्या एकूण सकल उत्पन्नापैकी केवळ ०.४८ टक्के रक्कम सार्वजनिक आरोग्यावर खर्च केली जाते. राज्याच्या एकूण बजेटच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३.६४ टक्के आहे.२०१९८-१९च्या अंदाजपत्रकानुसार दरडोई दरवर्षी हे बजेट केवळ १,००१ रुपये इतके आहे. याउलट राष्ट्रीय सरासरी ही १ हजार ५६० रुपये दरडोई दरवर्षी अशी आहे.