Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या लाचखोर अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बांधकाम अवैध असल्याचे सांगून एक लाख ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या संतोष पवार या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बांधकाम अवैध असल्याचे सांगून एक लाख ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या संतोष पवार या पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह अब्दुल खान यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करीत आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाच्या घराच्या छताचे बांधकाम सुरू असताना पालिकेच्या पी नॉर्थ वॉर्डमधील कनिष्ठ अभियंता संतोष पवार तेथे आला. त्याने बांधकामाचे फोटो काढले आणि अवैधरीत्या काम सुरू असल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी त्यांची भेट घेताच कारवाई करू नये म्हणून एक लाख ४० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी मे च्या पहिल्या आठवड्यात पवारला ३० हजार रुपये दिले. पुढे उर्वरित पैशांसाठी तगादा लावताच, तक्रारदार यांनी २३ तारखेला एसीबीकडे धाव घेतली. त्यानुसार एसीबीने सापळा रचला. तक्रारदार यांनी ठरल्याप्रमाणे पवार यांना पैसे देण्यास तयारी दर्शवताच, पवारने ते पैसे अब्दुल खानकडे देण्यास सांगितले. मंगळवारी एक लाख दहा हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली, तर एसीबीची कारवाई झाल्याचे समजताच पवार पसार झाला. याप्रकरणी एसीबी त्याचा शोध घेत आहे.