Join us

दुबई गाठण्यासाठी गरिबीशी लढाई

By admin | Updated: December 10, 2015 02:16 IST

शारीरिक व्यंगावर मात करत पोलिओग्रस्त संदीप गुरव विदेशात तिरंगा फडकवण्याच्या तयारीत आहे. व्हीलचेअर तलवारबाजी खेळात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

मुंबई : शारीरिक व्यंगावर मात करत पोलिओग्रस्त संदीप गुरव विदेशात तिरंगा फडकवण्याच्या तयारीत आहे. व्हीलचेअर तलवारबाजी खेळात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण आर्थिक समस्यांमुळे विश्वचषक भारतात आणण्याच्या त्याच्या स्वप्नांना खीळ बसत आहे.स्पर्धा १६ ते २१ डिसेंबरदरम्यान शारजा, दुबई येथे रंगणार आहे. या विश्वचषकासाठी भारतातील फक्त दोन खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात नागोठणेचा संदीप गुरव आणि चेन्नई, तामिळनाडूतील वेंकटेश रेड्डी यांचा समावेश आहे.संदीपची आर्थिक स्थिती बेताची आहे. या स्पर्धेसाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. अपंगत्वावर मात करून त्याने तलवारबाजीतील डावपेच आत्मसात केले खरे; पण ‘आधी लढाई गरिबीशी, नंतर प्रतिस्पर्ध्यांशी’, असे म्हणण्याची वेळ संदीपवर आली आहे. त्याच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा येथील आदर्श मित्रमंडळाने त्याला पाच हजार रुपयांची मदत केली आहे. ‘आमचे मित्रमंडळ आर्थिकदृष्ट्या मजबूत नसले, तरी जिल्ह्यातील एकमेव खेळाडू जागतिक स्पर्धेत सहभागी होत आहे. त्यामुळे आर्थिक सहकार्य करणे हे आमचे कर्तव्यच आहे,’ असे अध्यक्ष दावडे यांनी या वेळी सांगितले. संदीप दुबई जिंकून मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवेल यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाली येथील बल्लाळेश्वर विश्वस्त मंडळाकडून पंचवीस हजार आणि जांभूळपाडा येथील आनंदधाम वृद्धाश्रमाने पाच हजारांची मदत केली आहे. (क्रीडा प्रतिनिधी )