Join us  

'फायटर'ने उघडणार इरॅासचा दरवाजा, प्रजासत्ताक दिनी नव्या रूपात रसिकांच्या सेवेत रुजू

By संजय घावरे | Published: January 25, 2024 4:29 PM

ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाला नूतनीकरणानंतर इरॅासमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाचा मान मिळणार आहे.

मुंबई - मागील सात वर्षांपासून बंद असलेले इरॅास सिनेमागृह प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर नव्या रूप-रंगात रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या 'फायटर' चित्रपटाला नूतनीकरणानंतर इरॅासमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमाचा मान मिळणार आहे.

मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या चर्चगेट विभागात १९३८मध्ये सुरू झालेले इतिहासाच्या पाऊलखुणांची साक्ष देत उभे असलेले इरॅास सिनेमागृह २०१७पासून बंद होते. एप्रिल २०२३मध्ये हे सिनेमागृह तोडण्यात येणार असल्याची अफवा पसरली होती. ऐतिहासिक वास्तू असलेले इरॅास सिनेमागृह तोडण्यात येणार नसून नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यानुसार इरॅासचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

आयमॅक्स कॉर्पोरेशनचे व्हिपी सेल्स प्रीतम डेनियल यांनी एक्स अकाउंटवर पोस्ट लिहून इरॅास सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. इरॅास हे भारतातील आयकॉनिक सिनामागृहांपैकी एक आहे. २६ जानेवारीला पीव्हीआर आयनॅाक्स या आयकॉनिक सिनेमागृहात आयमॅक्स सुरू करणार आहे. इथे आता आयमॅक्स आॅडिटोरियमखेरीज आणखी काही स्क्रीन्स असतील. ऋतिक-दीपिकाचा 'फायटर' इथे सर्वप्रथम रिलीज होणार असल्याचेही त्यांनी लिहिले आहे.

यापूर्वी २०१८ मध्ये इरॅास सुरू होणार असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी १२०४ आसने होती आणि बाल्कनीच्या जागी ३०० सीट्स केल्या जातील अशी चर्चा रंगली होती, पण तसे काही झाले नाही. त्यानंतर पुन्हा मागच्या वर्षी इरॅासबाबतची उफवा पसरली होती, तेव्हा पुन्हा जनआक्रोश उसळला होता. अखेर इरॅास सुरू होण्यासाठी २०२४ वर्ष यावे लागले. 

टॅग्स :मुंबईहृतिक रोशनदीपिका पादुकोण