Join us  

'हाइट'ची 'फाइट'... शिवरायांच्या पुतळ्याच्या उंचीत कपात, पण म्यानातून उसळणार तलवारीची पात!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 12:16 PM

मुंबईच्या अरबी समुद्रात उभारलं जाणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, अशी गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली खरी; पण..

मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारलं जाणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, अशी गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली खरी; पण ती आपल्याला 'महागात' पडत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी भारीच शक्कल लढवल्याचं समजतं. खर्चामुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करावी लागेल, असा निर्णय सरकारला नाईलाजाने घ्यावा लागला. पण, महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीत कपात करावी लागली म्हणून काय झालं, तलवारीची पात अधिक उंच करू या आणि स्मारकाची उंची ठरलीय तेवढीच ठेवू या, असा तोडगा सरकारने शोधून काढला आहे. 'हाईट'साठी सुरू असलेली 'फाईट' माहिती अधिकारातून समोर आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक या ना त्या कारणाने सदैव चर्चेत आहे. कधी या स्मारकाच्या उंचीवरून, तर कधी स्मारकाच्या खर्चावरून हे स्मारक बातम्यांचा विषय ठरले आहे. आता, या स्मारकाच्या बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारने आराखड्यात काही बदल केल्याचे समजते. त्यानुसार महाराजांच्या पुतळ्याची उंची 7.5 मीटरने कमी करण्यात येणार आहे. तर महाराजांच्या हातातील तलवारीची उंची वाढविण्यात येणार आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते शिवस्मारकाचे  भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी, हा पुतळा अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा आणि चीनमध्ये होत असलेल्या भगवान बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (208 मीटर) उंच असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने सांगितले होते. 

दरम्यान, माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे, राज्य सरकारच्या प्रस्तावित आराखड्यानुसार पुतळ्याची उंची 121.2 मीटर असणार आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची उंची 83.2 मीटर तर त्यांच्या हातातील तलवारीची उंची 38 मीटर ठेवण्यात येणार होती. पण, राज्य सरकारने या पुतळ्याच्या बांधकाम खर्चात कपात करण्यासाठी पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुतळ्याची उंची 83.2 मीटर ऐवजी 75.7 मीटर करण्यात येणार आहे. तर तलवारीची उंची 38 मीटर ऐवजी 45.5 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुतळ्याची एकूण उंची 121.2 मीटर एवढीच राहणार आहे.

राज्य सरकारच्या नवीन प्रस्तावित आराखड्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा खर्च 338.94 कोटी रुपयांनी कमी झाला आहे. राज्य सरकारने एल अँड टी कंपनीला या पुतळ्याचे कंत्राट दिले. त्यानंतर, विरोधकांनी सरकारवर टीका करताना, पुतळ्याची उंची कमी करून चौथऱ्याची उंची वाढविल्याचा आरोप केला होता. पण, राज्य सरकारने हे आरोप फेटाळत पुतळ्याची उंची 121.2 मीटर एवढीच राहिल, असे सांगितले होते. दरम्यान, हे स्मारक तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असून स्मारकाची उंची 210 मीटर एवढी असणार आहे. त्यामुळे हे जगातील सर्वात उंच स्मारकही ठरणार आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजराज्य सरकारदेवेंद्र फडणवीस