Join us

सुरतहून प्रत्यारोपणासाठी आले पाचवे ‘हृदय’

By admin | Updated: May 25, 2016 02:45 IST

सुरत येथील ५४ वर्षीय रुग्णास ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी मूत्रपिंड, यकृत आणि हृदयदान करून चौघांना जीवनदान दिले आहे. दान केलेल्या हृदयामुळे एका ५३ वर्षीय

मुंबई : सुरत येथील ५४ वर्षीय रुग्णास ब्रेनडेड घोषित करण्यात आल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी मूत्रपिंड, यकृत आणि हृदयदान करून चौघांना जीवनदान दिले आहे. दान केलेल्या हृदयामुळे एका ५३ वर्षीय व्यक्तीस जीवनदान मिळाले आहे. सुरतहून हे पाचवे हृदय मुंबईला आणले गेले आहे. गेल्या १० महिन्यांत आत्तापर्यंत १८ हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सुरतच्या कटारगम परिसरात राहणारा रुग्ण गेल्या दोन महिन्यांपासून हृदयाच्या प्रतीक्षायादीत होता. त्याच्यावर मुंबईत फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णाच्या हृदयरोगावर हृदय प्रत्यारोपण हाच उपाय होता. औषधोपचार सुरू असतानाही या रुग्णाची प्रकृती नाजूक होती. दोन महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पण, तरीही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे हृदय मिळणे आवश्यक होते. सोमवारी सुरतच्या महावीर रुग्णालयात ५४ वर्षीय व्यक्तीस ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्याच्या कुटुंबीयांनी हृदयदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईहून डॉ. हेमंत पाठारे महावीर रुग्णालयात गेले होते. त्यांनी हे हृदय मुंबईपर्यंत आणले. हृदयदात्याच्या कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे एका व्यक्तीला जीवनदान मिळाले आहे. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. पुढील ४८ ते ७२ तास रुग्णाला अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वॉर्डमध्ये कधी हलवायचे हा निर्णय घेण्यात येईल, असे हृदयशल्य चिकित्सक डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)ग्रीन कॉरिडोर : सुरतहून हृदय मुंबईला आणण्यासाठी हवाई मार्गावर ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. मुंबई राष्ट्रीय विमानतळ (गेट क्र. ८) - मिलिट्री रोड - सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड - छेडा नगर - ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे - ऐरोली जंक्शन - फोर्टिस रुग्णालय या मार्गावर ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. यासाठी १४ पोलीस अधिकारी यामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांसह ६0 पोलीस शिपाई आणि हवालदार यांचाही समावेश होता.असा झाला हृदयाचा प्रवास...११.३५ - सुरतच्या महावीर रुग्णालयातून हृदय घेऊन डॉक्टर निघाले११.४८ - सुरत विमानतळावर हृदय पोहचले ११.५४ - हृदय चार्टर्ड फ्लाईटमध्ये हलवण्यात आले आणि फ्लाईटने टेक आॅफ केले१२.३३ - फ्लाईट मुंबई विमानतळावर उतरले१२.३४ - फ्लाईटमधून हृदय रुग्णवाहिकेत हलवण्यात आले१२.५२ - हृदय घेऊन रुग्णवाहिका फोर्टिस रुग्णालयात पोहचली; आणि हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरुवात झाली.(सकाळी ११.३५ ते दुपारी १२.५२ या कालावधीत झाला हृदयाचा प्रवास.)