Join us  

पाचवा स्मृतिदिन : बाळासाहेबांना आदरांजली,शिवतीर्थावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:00 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केलीे होती.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केलीे होती. शिवसैनिकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन केले. या वेळी दर्शनासाठी जमलेल्या बाळासाहेबांच्या चाहत्यांची भली मोठी रांग लागलेली पाहण्यास मिळाली.शिवतीर्थावर आदरांजली वाहण्यासाठी आलेल्यांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी सकाळपासूनच शिवतीर्थावर येणे सुरू केले होते. शिवतीर्थावर येणारे बहुसंख्य लोक हे रेल्वेने येत असल्याने अगदी दादर रेल्वे स्थानकापासून ते शिवाजी पार्कपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.शिवतीर्थावर रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच शिवसैनिकांनी शिवतीर्थावर गर्दी केलीे होती. दुपारी उन्हामुळे थोडी गर्दी कमी झाली.मात्र सायंकाळी ४ नंतर पुन्हा गर्दी वाढली.दादर रेल्वे स्थानकापासून ते थेट शिवाजी पार्कपर्यंत सर्वत्र शिवबंधन बांधलेले, खिशाला बाळासाहेबांचा फोटो लावलेले, हाती भगवा झेंडा घेतलेले, दुचाकीवर बाळासाहेबांचा फोटो लावलेले अनेक शिवसैनिक पाहण्यास मिळाले.शिवसेना भवनाबाहेर शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली.बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसाठी सेनेच्या स्थानिक नेत्यांतर्फे अल्पोपाहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अल्पोपाहाराच्या स्टॉलसमोर गर्दी होती.दादर रेल्वे स्थानकापासून ते शिवाजी पार्कपर्यंतच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी स्टॉल्स उभारले होते. स्टॉल्सवर भगवे झेंडे, भगवे स्टिकर्स, बाळासाहेबांचे फोटो, बाळासाहेबांचे फोटो असलेल्या विविध वस्तू, बाळासाहेब आणि शिवसेना पक्षाच्या कारकिर्दीवर आधारित पुस्तके आणि भगवे शिवबंधन विक्रीसाठी ठेवलेले होते.बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. सेनेच्या विविध प्रभागांमधील नगरसेविका महिला कार्यकर्त्यांच्या विविध गटांना सोबत घेऊन आल्या होत्या.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेना