Join us  

आई घेऊन जात नाही म्हणून उद्यानच सांभाळणार बछड्याला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 3:18 AM

बिबट्याच्या बछड्याला सध्या आईची नितांत गरज असून, वनविभागाने दोन वेळा त्याला जंगलात ठेवून आईची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला

मुंबई : येऊरच्या जंगलात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा सात दिवसांचा बछडा नागरिकांना आढळून आला. नुकत्याच जन्मलेल्या बछड्याला त्वरित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उद्यान प्रशासनाने बछड्याला आईजवळ पोहोचविण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केला, परंतु दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले. सोमवारी तिसरा प्रयत्न करण्यात आला. तोदेखील अपयशी ठरला. त्यामुळे आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच बछड्याचा सांभाळ करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बिबट्याच्या बछड्याला सध्या आईची नितांत गरज असून, वनविभागाने दोन वेळा त्याला जंगलात ठेवून आईची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या प्रयत्नात एक बिबट्या मादी पिल्लाजवळ येऊन गेली. मात्र, ती त्याला घेऊन गेली नाही. त्यामुळे तिसºया वेळी हाच प्रयोग करण्यात आला. यावेळी येऊरच्या जंगलात बछड्याला ठेवताना जागा बदलण्यात आली होती. तिथेही कोणतीही मादी फिरकली नाही. त्यामुळे आता बछड्याला वारंवार बाहेर ठेवणे धोक्याचे असून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन बछड्याचे संगोपन करणार आहे, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या व्याघ्र व सिंह विहाराचे वनपरिक्षेत्र अधिकारी (अधीक्षक) विजय बारब्दे यांनी सांगितले.

जंगलात बºयाचदा एखादी बिबट्या मादी बछड्याचे पालन-पोषण करू शकत नाही, तसेच एखादा बछडा खूपच कमजोर आहे, तर ती आपल्या बछड्याला सरळ सोडून देते. बछडा कमकुवत आहे, ते जंगलात जगू शकत नाही. त्यामुळे तिने ते सोडून दिले असणार, असे दिसून येते. बछड्याला सध्या आईच्या दुधाची व उबेची नित्तांत गरज आहे, पण दुर्दैवाने ते त्याला मिळत नाही आहे. मात्र, उद्यानातील वनअधिकारी त्याचा सांभाळ पोटच्या पोरासारखा करत आहे. त्यामुळे आता उद्यानातील बिबट्या निवारा केंद्र हे त्याचे घर असणार आहे.

टॅग्स :बिबट्यावनविभागमुंबई