Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूंचे सण धूमधडाक्यातच !

By admin | Updated: August 30, 2015 02:07 IST

रस्त्यांवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरे करण्यावर बंदी आणण्याचे सूतोवाच मुंबई उच्च न्यायालयाने केल्यानंतरही हे उत्सव वाजतगाजत सार्वजनिक स्वरुपात साजरे केले जाणारच

मुंबई : रस्त्यांवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरे करण्यावर बंदी आणण्याचे सूतोवाच मुंबई उच्च न्यायालयाने केल्यानंतरही हे उत्सव वाजतगाजत सार्वजनिक स्वरुपात साजरे केले जाणारच, असा निर्धार शिवसेना व विश्व हिंदू परिषद यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने लोकभावनेचा आदर करीत हिंदूंच्या सणांची पाठराखण करावी, अशी अपेक्षा हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांनी व्यक्त केली.इस्कॉनने केलेल्या अर्जावरील सुनावणीत रस्त्यावर पराकोटीचा गोंगाट करणारे धार्मिक सण बंद केले पाहिजेत, अशी टिप्पणी श्ुक्रवारी उच्च न्यायालयाने केली. तसेच गणेशोत्सव मंडळे खंडणीखोर झाल्याचा टोला हाणला. दहीहंडी उत्सवासंदर्भात अलीकडेच आदेश देताना न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवर निर्बंध घातले, गोविंदांच्या वयावर बंधने आणली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांत याबाबत पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, हिंदूंचे सण-उत्सव हा श्रद्धेचा प्रश्न असून न्यायालयाने या विषयात कायद्याचा दंडूका आपटत बसू नये. सरकारने लोकभावनेबरोबर असायला हवे. गणेशोत्सवाच्या वर्गणीला खंडणी म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे, असेही राऊत म्हणाले.विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री व्यंकटेश आबदेव म्हणाले की, हिंदूंच्या सण-उत्सवावर बंदी घालण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही. यापूर्वी दहीहंडीबाबत न्यायालयाचे आदेश आल्यावर सरकारने दहीहंडीचा समावेश साहसी खेळात केला. (विशेष प्रतिनिधी)लोकमान्य टिळक आज हयात असते तर त्यांनी पुन्हा एकदा न्यायालयाचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल केला असता.- संजय राऊत, शिवसेना खासदारगणेशोत्सव, शोभायात्रा या वाजतगाजत निघणारच. त्यावर कुणीच बंदी आणू शकत नाही. हिंमत असेल तर मशिदीवरील भोंगे बंद करून दाखवावे. - व्यंकटेश आबदेव, केंद्रीय मंत्री, विश्व हिंदू परिषद