मुंबई: पोलीस आयुक्तालयाला लागून असलेल्या पोलीस वसाहतीत एका महिला कॉन्स्टेबलची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिच्या पतीनेच चाकूने गळा कापून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपक पाटील (४७) असे त्याचे नाव असून आझाद मैदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घरगुती व आर्थिक वादातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.महिला कॉन्स्टेबल संध्या नांदिवडेकर-पाटील (४३) या गुन्हे अन्वेषण शाखेच्या संगणक विभागात नेमणुकीला होत्या. आयुक्तालयाच्या मागे असलेल्या पोलीस वसाहतीतील बी विंगमध्ये पती व मुलांसह त्या राहात होत्या. दीपक पाटील हा एलआयसीमध्ये क्लार्क आहे. बुधवारी सकाळी त्या घरात मृतावस्थेत आढळल्या. हात व गळ्यावर जखमा आढळल्याने सुरुवातीला त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र पोस्टमार्टेममध्ये गंभीर वार झाल्याचे स्पष्ट झाले. चौकशीअंती पतीने तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)
महिला कॉन्स्टेबलची पतीकडून हत्या
By admin | Updated: July 31, 2015 03:17 IST