Join us

चारा व पाण्यासाठी मेंढपाळांची वणवण

By admin | Updated: May 15, 2014 00:29 IST

नगर, नाशिक जिल्हयात पाण्याची टंचाई व जनावरांना पिण्याचे पाणी, चार्‍यांची कमतरता असल्याने नगर जिल्हयातील मेंढपाळ आपली मेंढरं घेवून त्याचे पोषण करण्यासाठी कासा भागातील जंगल परिसरात आले आहेत

कासा : नगर, नाशिक जिल्हयात पाण्याची टंचाई व जनावरांना पिण्याचे पाणी, चार्‍यांची कमतरता असल्याने नगर जिल्हयातील मेंढपाळ आपली मेंढरं घेवून त्याचे पोषण करण्यासाठी कासा भागातील जंगल परिसरात आले आहेत व मेंढयांच्या चार्‍यासाठी एका गावातून दुसर्‍या गावात धडपडताना सदर धनगर मंडळी दिसत आहेत. नगर जिल्हयात मोठया प्रमाणात पाणीटंचाई असल्याने चार्‍याअभावी जनावरांची उपासमार होते. म्हणून आपल्या मेंढयांसह नगर जिल्हयातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील तुकाराम कोकरे व इश्वर कोळपे हे कासा भागात आले आहेत. जिल्हयात पाणी टंचाई, उन्हाळयात जनावरांना प्यायला पाणी मिळत नाही.चारा मिळत नाही. पर्यायाने पावसाळा सुरू होईपर्यंत मेंढरांना चार्‍यासाठी व पाण्यासाठी ठाणे जिल्हयातील विशेष करून जंगल भागातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, पालघर, वाडा भागात आणावे लागते. दरम्यान कळपातील एकूण ३०० मेंढयांपैकी १०० मेंढ्या आपल्या दोन कुटुुंबीयांचे असून उर्वरित इतर मालकांच्या आहेत. ती चार्‍यांसाठी आपण दरवर्षी आणत असून एका मेंढयाचे ३० रूपये प्रती महिना चार्‍यासाठी आपल्याला खर्च देत असल्याचे त्यांनी सांगितले व वर्षअखेरीस काही मेंढया मालक देत असल्याचे त्यांनी सांगितले. तर पावसाळयात आपण मालकाकडे मोलमजुरी करत असल्याचे पुढे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)