Join us  

उत्सवकाळात सार्वजनिक प्रवासाची धास्ती; नवरात्रौत्सव, दसरा-दिवाळीत फिरायची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 2:30 AM

८१ टक्के लोकांचा प्रवास टाळण्यावर भर

मुंबई : अनेक जण घराबाहेर पडले आणि कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले. त्या पार्श्वभूमीवर येत्या नवरात्रौत्सव, दसरा-दिवाळी, छटपूजा यांसारख्या उत्सवांच्या काळात सार्वजनिक प्रवासी सेवांमधून प्रवास करण्याची धास्ती लोकांना वाटत आहे. जवळपास ८१ टक्के लोकांनी या सणांच्या काळात प्रवास करणार नाही, असे मत नोंदविले आहे.

प्रवास केला तर त्यासाठी विमान, टॅक्सी किंवा खासगी कारला प्राधान्य देऊ, असे उर्वरित १९ टक्के लोकांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, तर प्रवासावरील निर्बंध शिथिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या आॅनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने देशातील २३९ जिल्ह्यांतील २५ हजार जणांशी बोलून उत्सवकाळातील प्रवासाबाबतची मते जाणून घेतली. त्यानुसार, या वर्षअखेरपर्यंत प्रवास करणार नाही, असे मत ६९ टक्के लोकांनी व्यक्त केले. ३ टक्के लोकांनी पर्यटनस्थळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. फक्त कुटुंब आणि मित्रांकडे जाऊ, असे सांगणाऱ्यांचे प्रमाण १३ टक्के आहे. तर, या प्रवासाबाबत नक्की कोणती भूमिका घ्यायची याबाबत १२ टक्के लोकांमध्ये संभ्रम आहे.

६ टक्के लोकांचीच ट्रेनला पसंती

प्रवासासाठी कोणत्या स्वरूपाच्या वाहतूक व्यवस्थेचा वापर कराल, असा प्रश्न विचारल्यानंतर फक्त ६ टक्के लोकांनी ट्रेनला पसंती दिली. तर, रस्तामार्गे कार किंवा टॅक्सीने प्रवास करू, असे सांगणाºयांचे प्रमाण ३८ टक्के आहे. परराज्यातील प्रवासासाठी विमान प्रवास सुरक्षित असल्याचे २३ टक्के लोकांचे म्हणणे आहे. या प्रवासासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करणे ६८ टक्के लोकांनी टाळले आहे. प्रवासाचा दिवस जवळ आल्यानंतर या बुकिंगचा निर्णय घेऊ, असे १६ टक्के लोक सांगतात. काही जणांनी दोन तर काही जणांनी तीन पर्यायांसाठी मत नोंदवले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस