Join us

वाढणा-या मतदानाची धास्ती

By admin | Updated: October 10, 2014 23:22 IST

नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत मतदानाचा हक्क येत्या १५ आॅक्टोबर रोजी बजावण्याकरिता सामूहिक शपथ घेण्याचे उपक्रम सुरु केले आहेत.

जयंत धुळप , अलिबागग्रामीण ते शहरी, आदिवासीवाडी ते रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, पायवाट ते महामार्ग, नवतरुण ते ज्येष्ठ नागरिक, गरीब ते श्रीमंत अशा समाजातील सर्व थरातील आणि परिसरातील मतदारांपर्यंत भारत निवडणूक आयोगाचे मतदार जनजागृती अभियान रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात अत्यंत प्रभावीपणे पोहोचले आहे. याचा परिणाम म्हणून मतदानाची टक्केवारी ९० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत मतदानाचा हक्क येत्या १५ आॅक्टोबर रोजी बजावण्याकरिता सामूहिक शपथ घेण्याचे उपक्रम सुरु केले आहेत. या अभियानाकरिता रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी कल्पकता दाखवून जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय यंत्रणेला प्रोत्साहित करून अंमलबजावणी केली आहे. मतदार जनजागृती अभियान केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर ती सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे या भावनेतून अशासकीय संस्था, जिल्ह्यातील सर्व बँका, विविध उद्योग-कारखाने यामधील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येवून आपापल्या कार्यक्षेत्रांतील नागरिकांना मतदानाकरिता लोकजागृतीही करू लागले आहेत. युवा पथनाट्यांचे १०० तर जनजागृती रथाचे ५०० प्रयोग महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवकांनी मतदान हा पवित्र हक्क आम्ही बजावणारच, शिवाय आपापल्या परिसरातील नागरिकांना मतदानाकरिता जागृत करणार अशी शपथ घेवूनच कामाला सुरवात केली. यामध्ये विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था आणि समय क्रिएटीव्ह सामाजिक विकास संस्था या संस्थेतील कलाकार युवा मंडळींनी मतदान जनजागृती करिता चक्क पथनाट्याची निर्मिती करुन जिल्ह्यातील सर्व बस स्थानके, प्रमुख गर्दीचे नाके व चौक येथे पथनाट्याचे तब्बल १०० हून अधिक प्रयोग सादर करण्यात आले आहेत. पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने महिलांची स्कूटर रॅली काढून जनजागृती केली.गेल्या सुमारे १५ ते २० दिवसांपासून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या प्रभावी मतदार जनजागृती अभियानामुळे यावेळी मतदान टक्केवारी निश्चितपणे वाढणार असा विश्वास मतदार जनजागृती अभियानाचे प्रमुख तहसीलदार एस.डी.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.