Join us  

Maharashtra election 2019 : देशापुढील संकट अधिक गडद होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 6:17 AM

खासदार असदुद्दीन ओवेसी : काँग्रेसवर केला भेदभावाचा आरोप

मुंबई : देशावरील सध्याचे संकट अधिक गडद होण्याची भीती असून, परिस्थिती सुधारण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सारासार विचार करून योग्यपणे मतदानाचा वापर करावा, असे आवाहन एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. धारावी विधानसभा मतदारसंघात ९० फूट रस्तापरिसरात पक्षाचे उमेदवार मनोज संसारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

ओवेसी म्हणाले, माझ्यावर भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप करणारी काँग्रेसच हिंदू-मुस्लीम असा भेदभाव करत आली आहे. मुंबई दंगल प्रकरणी न्या.श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात नाव असलेल्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती, तर विद्यमान सरकारने जीएसटी, नोटाबंदी करून सर्वसामान्यांचे जीवन उद्धस्त केले आहे. धारावीतील उद्योजकांना सरकारच्या धोरणांचा मोठा फटका बसला. राहुल गांधी सत्तर वर्षांत विकास न झाल्याची कबुली देतात. काँग्रेसने यूएपीएसारख्या अन्यायकारक कायद्याच्या सुधारणेला भाजपला पाठिंबा दिला. त्याचा फटका दलित, वंचित, मुस्लीम, कामगार, आदिवासी वर्गाला बसत आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीवन अशक्य असून, गांधी, नेहरू, पटेल यांच्या विचारधारेपासून पक्ष कोसो दूर गेला आहे. भाजपच्या हिंदुत्वासमोर काँग्रेसने सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग पत्करला, हा काँग्रेसचा दुटप्पीपणा आहे. काँग्रेसचा मतदार भाजपकडे वळला आहे आणि काँग्रेस मात्र आमच्यावर टीका करत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दलित, वंचित, मुस्लीम, कामगार, आदिवासी या वर्गाने एकत्रित येऊन जबाबदारीने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक व पक्षाचे उमेदवार मनोज संसारे म्हणाले, पस्तीस वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या गायकवाड घराण्याने धारावीचा विनाश केला. केंद्र व राज्यात सत्ता असताना ते धारावीला स्वर्ग बनवू शकत होते, पण त्यांनी धारावीला नरक बनविले. अपक्ष, नगरसेवक म्हणून जे काम मी वडाळामध्ये करू शकलो, तेदेखील धारावीत होऊ शकले नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्प २००४ मध्ये सुरू झाला. मात्र, १५ वर्षांनंतरही तो पूर्ण झालेला नाही. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारप्रमाणे भाजप सरकारने धारावीवासीयांची फसवणूक केली. धारावीचा बीकेसीप्रमाणे विकास करू, असे आश्वासन त्यांनी दिले.आमचा संबंध फक्त भारताशीच!कुणाच्या मेहेरबानीने नव्हे, तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशात मुस्लीम समाज आनंदात राहत असून, शेवटपर्यंत राहील. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा कुणाच्या मर्जीची गरज नसल्याचे त्यांनी ठणकावले. पाकिस्तान व इतर कोणत्याही मुस्लीम देशांसोबत आमचा संबंध नाही, आमचा संबंध भारत या आमच्या देशाशी असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :असदुद्दीन ओवेसी