Join us  

मुंबईकरांच्या मनात कोरोनाचे भय अन् गणपतीच्या स्वागताचा उत्साहही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 6:09 AM

फुलांचा बाजार असो की सजावटीच्या सामानाची दुकाने की भाजी मंडया, सगळीकडे दोन-तीन दिवसांपासून दिसत असलेल्या गर्दीने गुरुवारी कळसच गाठला.

मुंबई : आणखी चोवीस तासांनी विघ्नहर्ता गणेशाची घरोघरी यथासांग पूजा सुरू होईल. त्या बाप्पाच्या स्वागतात कुठेही काही कमी पडता कामा नये अशा उत्साहाने गणेशभक्त कामाला लागले आहेत. फुलांचा बाजार असो की सजावटीच्या सामानाची दुकाने की भाजी मंडया, सगळीकडे दोन-तीन दिवसांपासून दिसत असलेल्या गर्दीने गुरुवारी कळसच गाठला. छोट्या-मोठ्या सरींमधून बरसणाऱ्या पावसानेही मग त्यात भर घातली आणि वाहतूककोंडी, खरेदीचा उत्साह, वाढलेल्या किमती हे कोरोनापूर्व काळातील दृश्य मुंबई शहर आणि उपनगरातील सर्वच बाजारपेठांमध्ये दिसले.मुंबापुरीत यंदा गणेशोत्सवासोबत आरोग्य उत्सव आणि पर्यावरणोत्सव साजरा होत आहे.अनेक मंडळांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, घराघरातदेखील मुंबईकर बाप्पाची सेवा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोनाच्या भयाने पछाडल्याने आणि त्यात कायद्याचाही धाक दाखवण्यात आल्याने मुंबईकरांनी रस्तोरस्ती येण्याचे टाळले होते. पण जसजशी बंधने कमी होत आहेत तसतसा मुंबईकर पूर्ववत कामाला लागल्याचे दिसत आहे. दुकानांमध्ये होणारी गर्दी हे दादर, परळ, लालबाग, भायखळ्यातील चित्र आता सगळीकडे दिसते आहे.सजावटीसाठी लागणारे तोरण, दिवे, प्रसाद, नैवेद्य असे बरेच काही साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी गुरुवारी बाजारात गर्दी केली होती. लालबाग आणि दादर येथील बाजारपेठांसह मुंबईतील सर्वच ठिकाणी जोरदार खरेदी सुरू होती.>मिरवणुका नाहीतबाप्पांना घरी किंवा मंडपात आणताना वाजतगाजत काढल्या जाणाºया मिरवणुका हे गेल्या काही काळातील वैशिष्ट्य ठरले होते. यंदा मात्र या उत्साहाला मुरड घालण्यात आली आहे. त्यामुळे बाप्पांचे आगमन झाले ते कमीत कमी भक्तांच्या उपस्थितीत.>वाहतूककोंडीखरेदीची लगबग, पावसाची संततधार हजेरी व रस्त्यावरील खड्डे यांच्यामुळे मुंबईत जागोजागी वाहतूककोंडी झाली. मुंबईतून बाहेर जाणाºया मार्गांवरही नेहमीपेक्षा जास्त वर्दळ होती.

टॅग्स :गणेशोत्सव