मुंबई : कोरोना संसर्गामुळे अनेक रुग्णालयांचे रूपांतर कोविड रुग्णालयात केल्याने इतर आजार असलेल्या रुग्णांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता हळूहळू पालिका रुग्णालयातील बाह्य सेवांसह बहुतेक विभाग हळूहळू सामान्य स्थितीत परत येत आहेत. अजूनही मानसोपचार विभागात कोरोना संसर्गाच्या भीतीने रुग्ण येण्यास घाबरत असल्याची स्थिती आहे.
केईएम रुग्णालयात दर दिवशी मानसोपचार विभागात साधारण ३५०-४०० रुग्ण उपचारांसाठी येतात. या विभागासाठी ६० खाटा राखीव असून व्यसनाधीन वा स्क्रीझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांना उपचारांकरिता दाखल करण्यात येते. काही अपवादात्मक स्थितीत एखाद्या प्रसंगी मनोरुग्णांना सांभाळणे व उपचार प्रक्रियेत आणणे आव्हानात्मक होते, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. सायन रुग्णालयातील मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. नीलेश शहा म्हणाले, तीन महिन्यांत ओपीडीमध्ये मानसिक रुग्णांची संख्या २५० ते ३०० वरून १५० पर्यंत खाली आली आहे. ही संख्या कमी होण्यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. एक तर मानसिक रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात यायला घाबरतात आणि दुसरे म्हणजे, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आम्हाला कर्मचाऱ्यांची कमतरताही भासू लागली आहे. सायन रुग्णालयाप्रमाणेच सर्व रुग्णालयांमधील मानसोपचार विभाग सध्या कोविडशी संबंधित रुग्णांच्या समुपदेशनावर काम करत आहेत. शिवाय, मनोविकृत आणि स्किझोफ्रेनिक रुग्ण हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नाही.
सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, साधारण ५००च्या घरात दररोज मानसोपचार विभागात रुग्ण उपचारांस येतात. त्यातील ज्या रुग्णांना दाखल करण्याची गरज भासते, त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात येते. सध्या या विभागाचे नूतनीकऱण सुरू असल्याने काही रुग्णांना दाखल करून घेता येत नसल्याने बाह्यरुग्ण विभागात नियमितपणे त्यांच्यावर उपचार कऱण्यात येतात.
चौकट
सोशल आयसोलेशनमुळे ताण वाढतोय
पोस्ट कोविड बऱ्याच लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. कोविड काळात लोकांना ‘सोशियल आयसोलेट’ व्हावे लागले. अनेकांना काही महिने घरात थांबावे लागले. यामुळे व्यक्तीची ‘सोशियल लाईफ’ थांबली. माणसांशी येणारा संबंध कमी झाला. एकटेपणामुळे व्यक्तीची घुसमट होऊ लागली. मात्र त्याला आपले दुःख किंवा अडचणी कुणाला सांगता आल्या नाहीत. मित्रांशी, नातेवाइकांची समोरासमोर चर्चा करता आली नाही. त्यामुळे ‘सोशल सपोर्ट’ कमी झाला. आता दैनंदिन व्यवहार तसेच कामकाज बऱ्यापैकी सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक जण नैराश्यातून बाहेर पडले असून मानसिक त्रास कमी झाला आहे. मात्र ज्यांना मानसिक आजाराची लक्षणे जाणवतात, जे अजूनही त्या त्रासातून बाहेर पडले नाहीत त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे. मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.
संसर्गाची भीती कायम
- मनोरुग्णाचे नातेवाईक
मागील एप्रिल महिन्यापासून कुटुंबातील रुग्णावर मानसोपचार सुरू आहेत. मात्र त्यानंतर लाॅकडाऊनमुळे उपचारांना विलंब झाला. आता उपचार सुरू केले आहेत, मात्र तरीही त्यात नियमितता नाहीय, कोरोनाचा संसर्ग होईल याची भीती वाटते, त्यामुळे त्यात दोन-एक महिन्यांचा कालावधी लागतो.
टेलिमेडिसीनचा पर्याय
- मनोरुग्णाचे नातेवाईक
सुरुवातीला पालिका रुग्णालयात मानसोपचार विभागात उपचार सुरू होते, मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने हे उपचार लांबले. त्यामुळे आता खासगी रुग्णालयात टेलिमेडिसीनचा पर्याय स्वीकारून हे उपचार सुरू केले आहेत. अशा स्वरूपाची सेवा पालिका-शासकीय रुग्णालयात परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे.