Join us  

लसीकरणाच्या दुष्परिणामांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती, लसीकरणाच्या टक्केवारीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 9:05 AM

लसीकरणाच्या टक्केवारीवरही याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मुंबईत डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

मुंबई : कोरोना लसीकरणानंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर दुष्परिणांमांविषयी विविध चर्चा कानावर येत आहेत. परिणामी, शहर-उपनगरात मंगळवारी पार पडलेल्या लसीकरणादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी याची धास्ती घेतली असून यामुळे तुरळक प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्रावर हजेरी लावली. लसीकरणाच्या टक्केवारीवरही याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, मुंबईत डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.याविषयी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, लसीकरणाच्या दिवशी ५० टक्के लसीकरण झाले. पहिल्या दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी ४ हजारांच्या जवळपास लाभार्थ्यांची यादी होती, यापैकी २ हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. या दिवशी लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. तर मंगळवारी ३ हजार लाभार्थ्यांची यादी होती, त्यापैकी १ हजार ५०९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.मुंबईत लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ६६० तर उपनगरात १ हजार २६६ व्यक्तींचे लसीकरण कऱण्यात आले आहे. राज्यात मुंबईत सर्वाधिक लसीकरण पार पडले, मात्र त्या तुलनेत लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी राज्यासह शहर-उपनगरात लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनुपस्थिती दर्शविली. कोरोना लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पहिल्या दिवशी मुंबईतील नऊ केंद्रांमध्ये १२ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेच्या आरोग्य विभागाने ठेवले होते, मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही.एका बाटलीत १० डोस लसीच्या एका बाटलीतून दहा जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्ट जातात.

चार जणांना हलका तापमुंबईत रविवारपर्यंत लसीकरण झालेल्यांपैकी चार जणांमध्ये हलका ताप आणि सांधेदुखीची नोंद झाली आहे. राज्यात रविवारपर्यंत २२ लाभार्थींमध्ये किरकोळ आरोग्याच्या समस्या आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. डोकेदुखी, सौम्य ताप, इंजेक्शन दिलेल्या जागेवर सौम्य वेदना यासारख्या सामान्य आरोग्याच्या समस्या जाणवल्या.

मुंबईत एकावर उपचार सुरू -व्ही.एन. देसाई रुग्णालयातील ५१ वर्षीय डॉ. जयराज आचार्य यांना शनिवारी कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर चक्कर, अशक्तपणा, डिहायड्रेशन आणि ताप यांसारख्या तक्रारींसाठी रविवारी अतिदक्षता विभागात दाखल केले गेले. दरम्यान, आता त्यांची प्रकृती स्थिर असून ताप कमी झाला असल्याचे व्ही.एन. देसाई रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांना मंगळवारी उशिरा संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज दिला जाईल असे व्ही.एन.देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रभाकर मोरे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्याऔषधंहॉस्पिटल