बिरवाडी : महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक १५ आॅक्टोबरला होणार असून निवडणुकीच्या प्रचाराकरिता फक्त १ महिन्याचा कालावधी उपलब्ध असताना पितृपक्षामध्ये राजकीय पक्षाच्या नेतेगणांनी प्रचाराचा अधिकृतपणे शुभारंभ करणे टाळले असल्याचे पहावयास मिळत आहे. महाराष्ट्रामधील २८८ जागांकरिता १५ आॅक्टोबरला मतदान होणार असून याकरिता शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, आरपीआय या प्रमुख राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असली तरी ऐन निवडणुकीच्या प्रचारावर पितृपक्षाचे सावट कायम आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे उमेदवार आपल्या प्रचाराची सुरूवात घटस्थापनेपासून सुरू करू शकतात.रायगड जिल्ह्यातील सात जागांचे आकडेवारी लक्षात घेता रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त होईल अशी स्थिती नसल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यातच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस माणिक जगताप, महाडचे शिवसेना आ. भरत गोगावले यांची राजकीय प्रतिष्ठा या विधानसभा निवडणुकीत पणाला लागणार असून महाड विधानसभा १९४ मधील २०१४ च्या निवडणुकीत काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
निवडणुकीच्या प्रचाराला पितृपक्षाचे सावट
By admin | Updated: September 14, 2014 23:22 IST