Join us  

गरोदर मुलीचा खून करणाऱ्या पित्याची फाशी कायम; हायकोर्टाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 4:53 AM

नाशिकमधील ‘ऑनर किलिंग’चे प्रकरण

मुंबई : परजातीमधील मुलाशी प्रेमविवाह करून घराण्याची इभ्रत धुळीला मिळविल्याच्या रागातून स्वत:च्याच नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीचा गळा आवळून खून करणाºया नाशिक येथील एकनाथ किसन कुंभारकर या ४४ वर्षांच्या नराधम पित्याच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.मोरे मळा, भडंगे, बाबाची चाळ, पंचवटी, नाशिक येथे राहणाºया एकनाथ याने प्रमिला या त्याच्या विवाहित मुलीचा २८ जून २०१३ रोजी गंगापूर नाक्याजवळील सावकार हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षा थांबवून गळा आवळून खून केला होता. त्याबद्दल नाशिकच्या सत्र न्यायालयाने त्याला जुलै २०१७मध्ये फाशी ठोठावली होती. ही फाशी कायम करण्याचे प्रकरण व शिक्षेविरुद्ध एकनाथने केलेले अपिल यावर एकत्र सुनावणी झाल्यानंतर न्या. बी. पी. धर्मा धिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने फाशी कायम केली.ज्यासाठी फक्त फाशीच दिली जाऊ शकते असे हे ‘विरळात विरळा’ या वर्गात मोडणारे प्रकरण नाही. हा भावनेच्या भरात केलेला खून आहे. शिवाय आरोपी तरुण आहे, असे मुद्दे मांडून आरोपीच्या वतीने फाशी कायम न करण्याची विनंती केली गेली. अभियोग पक्षातर्फे अशा नराधमांना फक्त फाशी हिच योग्य शिक्षा आहे, अशी ठाम मूमिका मांडण्यात आली.फाशी कायम करताना खंडपीठाने म्हटले की, आरोपीने हा खून ज्या पद्धतीने केला त्यावरून त्याने त्याची योजनाबद्ध पद्धतीने पूर्वतयारी केली होती, हे स्पष्ट होते. त्यामुळे हा भावनेच्या भरात नव्हे तर शांत डोक्याने आणि पूर्ण विचाराने केलेला खून आहे. घराण्याच्या इभ्रतीच्या खोट्या अभिमानापोटी इथे आरोपीने आपल्या गरोदर मुलीचाच नव्हे तर तिच्या पोटातील आपल्या नातवंडाचाही खून केला आहे. हे कृत्य बापलेकीच्या पवित्र नात्यास कलंक फासणारे आहे. असा इसम जिवंत राहणे केवळ समाजालाच नव्हे तर त्याच्या पत्नीलाही धोकादायक आहे.तरीही या निकालाविरुद्ध आरोपीस सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी यासाठी खंडपीठाने एकनाथला प्रत्यक्ष फासावर लटकविण्यास, अपिलाची मुदत संपेपर्यंत, स्थगिती दिली. या सुनावणीत सरकारतर्फे अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर प्राजक्ता शिंदे यांनी तर आरोपी एकनाथसाठी अ‍ॅड. रोहन सोनावणे यांनी काम पाहिले.आंतरजातीय विवाह केल्याच्या रागात काढला काटाप्रमिलाने कामगार नगरात राहणाºया दीपक कांबळेशी प्रेमविवाह केला.आपल्या मुलीने केलेला हा आंतरजातीय विवाह एकनाथला आवडला नाही. त्याने त्याचा राग डोक्यात ठेवून प्रमिलाचा काटा काढण्याचे मनात पक्के केले.२८ जून २०१३ रोजी सकाळी एकनाथ शेजारी राहणाºया प्रमोद अहिरे या रिक्षावाल्याकडे गेला. आपला भाऊ नवनाथ याला अपघात झाला असल्याचे सांगून त्याने प्रमोदला रिक्षा घेऊन नांदूर नाक्याकडे जायचे आहे, असे सांगितले.रिक्षा थोडा वेळ इकडे -तिकडे फिरविल्यावर त्याने नवनाथचा अपघात हे थोतांड असल्याचे सांगून आपली आई खूप आजारी आहे व प्रमिलाला भेटण्याची तिची शेवटची इच्छा आहे, अशी नवी थाप त्याने प्रमोदला मारली.प्रमोदची रिक्षा घेऊन एकनाथ प्रमिलाच्या सासरी गेला. शेवटचे श्वास घेतलेल्या आजीला भेटवून परत आणून सोडतो, असे सांगून तो प्रमिलाला रिक्षेत घालून निघाला.केटीएचएम कॉलेजवरून पंडित कॉलनीत आल्यावर एकनाथने गंगापूर नाक्यावर रिक्षा सावकार इस्पितळाजवळ थांबवून प्रमोदला हॉस्पिटलमध्ये कोणी आहे का पाहण्यास सांगितले.बºयाच हाका मारल्यावर इस्पितळाचा एक रखवालदार बाहेर आला. त्याच्याशी बोलून प्रमोद परत रिक्षेपाशी आला तर नाकातोंडातून फेस येत असलेली प्रमिला एकनाथच्या अंगावर कलंडलेली त्याला दिसली. विचारल्यावर एकनाथने ‘मी जे काही केले त्याचा जराही पश्चात्ताप नाही’, असे प्रमोदला सांगितले.

टॅग्स :मुंबई हायकोर्ट