लेखक नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप अन् आम्ही’ हे पुस्तक तर बापालाच वाहिलेले आहे. जीवनाचे रांगडे तत्त्वज्ञान आचरणात आणणाऱ्या या बापानेच कोणतेही शिक्षण न घेता मुलांना मात्र ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या आंबेडकरांच्या शिकवणीनुसार मोठे केले आणि उत्तुंग शिखर गाठण्याची जिद्द, ऊर्मी दिली. बापाच्या तटस्थ, कर्तव्यकठोर प्रतिमेला छेद देणारे, बापालाही एक कोमल, संवेदनशील मन असते, हे पटवून देणारे एकमेव पुस्तक म्हणजे ‘बापलेकी’. मराठी साहित्यातील नामवंत लेखक बापांच्या मुलींनी आपल्या पित्याबद्दल मनमोकळेपणाने आपले मनोगत व्यक्त केले आहे.मुंबई : ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे म्हटले तरी बापाचे महत्त्वही तितकेच आहे. परंतु चिडणाऱ्या, रागावणाऱ्या बापाची प्रतिमा मुलांच्या मनात आईइतका हळवेपणा निर्माण करत नाही. पण बाप काय काम करतो, त्याची घुसमट, त्याला कुटुंब चालवताना सहन करावे लागणारे मान-अपमान यांसारखे किती तरी प्रसंग तो मनात साठवतो. ‘इंटरनॅशनल फादर्स डे’च्या निमित्ताने याच ‘बापा’विषयी मराठी साहित्यात उमटलेले प्रतिबिंब लक्ष वेधून घेणारे आहे.मराठी साहित्यात वडिलांप्रति असणाऱ्या भावनांचा शोध घ्यायचा झाल्यास फार मागे नाही गेलो, तरी मराठी साहित्यात अभिप्रेत असणाऱ्या आधुनिक काळापासून शोध घेता येईल. साधारणत: १८८५ म्हणजे कवी केशवसुतांचा काळ. ‘गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे’या कवितेत केशवसुतांनी केवळ दोन कडव्यांमधून आपल्या वडिलांप्रति असणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या अशा ‘डावीस हा बघ निरेखुनि एक माचा, निद्रिस्थ त्यावरि पिता अतिपूज्य माझा, त्याचा खरोखर न मी क्षण पुत्र शोभे! तो सर्वदा जरि म्हणे मज पुत्र लोभे!’ नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजेच कवी ‘बीं’नी तर ‘माझी कन्या’ ही कविता लिहून समस्त पित्यांसाठी एक आदर्शच समोर ठेवला आहे. संपूर्ण कवितेत आपल्या रुसलेल्या लाडक्या कन्येला मनवणारा बाप, शेवटी मुलीचे कोडकौतुक पुरवू न शकल्यामुळे बापाच्या हृदयाला कशा यातना होतात, याची खंत व्यक्त करतो. ‘बाप’ नावाच्या कवितेत कवयित्री लता ऐवळे लिहितात की, ‘उभा जलम घालवला अशा पेटत्या वणव्यात, पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात, दिला सबुद मी त्याला शेवटच्या वक्ताला, माझं जीवनं घडवीनं नाव तुमचंच घेताना....!’ ‘बाप’ या कवितासंग्रहातील कविता मुक्तछंद प्रकारातील आहेत. माझ्यासाठी, भैरवी, हा थंड वारा, कुठेतरी कधीतरी, तृप्त तिन्हीसांज, तू, दुरावा यासारख्या कविता अंतर्मनातील हळव्या भावनांना साद घालताना दिसतात.नव्वदीनंतरच्या साहित्यात मुलगा असा नात्याचा एकच एक धागा घेऊन लेखन झाले नसले, तरी काही स्त्री कादंबरीकारांच्या लेखनात ओघातच का होईना, पण बाप आणि मुलगी यांच्यामधील नात्याचे चित्रण बऱ्याच ठिकाणी आलेले दिसते. प्रामुख्याने आशा बगे यांच्या ‘सेतू’ कादंबरीत नायिका सुचरिता आणि तिचे वडील यातील संबंध वैशिष्ट्यपूर्ण दाखविले आहेत. तसेच, आशा बगेंच्या ‘झुंबर’ कादंबरीतली वसुमतीदेखील प्रियकरासमोर प्रेमाची कबुली जेवढ्या मनमोकळेपणे देऊ शकली नाही, त्यापेक्षा वडिलांजवळ उलट चटकन मनातली गोष्ट सांगू लागली.लेखक नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप अन् आम्ही’ हे पुस्तक तर बापालाच वाहिलेले आहे. जीवनाचे रांगडे तत्त्वज्ञान आचरणात आणणाऱ्या या बापानेच कोणतेही शिक्षण न घेता मुलांना मात्र ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या आंबेडकरांच्या शिकवणीनुसार मोठे केले आणि उत्तुंग शिखर गाठण्याची जिद्द, ऊर्मी दिली. बापाच्या तटस्थ, कर्तव्यकठोर प्रतिमेला छेद देणारे, बापालाही एक कोमल, संवेदनशील मन असते, हे पटवून देणारे एकमेव पुस्तक म्हणजे ‘बापलेकी’. मराठी साहित्यातील नामवंत लेखक बापांच्या मुलींनी पित्याबद्दल मनमोकळेपणाने मनोगत व्यक्त केले आहे. त्यात दुर्गा भागवत, जाई निंबाळकर, गौरी देशपांडे, लीला पाटील, विद्या विद्वंस, पद्मजा फाटक, अरुणा डेरे अशा अनेकांचा समावेश आहे. आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या या कन्यांनी कधी प्रेमळ, कधी शिस्तप्रिय, कधी तापट, कधी स्थितप्रज्ञ, कधी औदार्यशील वाटणाऱ्या पित्याचे विविध पैलू त्यांच्या गुण-दोषांसकट नि:संकोचपणे मांडलेले आहेत. (प्रतिनिधी)
मराठी साहित्यातील ‘बाप’माणूस!
By admin | Updated: June 19, 2016 04:10 IST