Join us  

श्वानाच्या बचावासाठी बापाने मुलाला गमावले, दुसऱ्या मुलास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 6:22 AM

जुहूमधील प्रकार : रागाच्या भरात मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या, वडिलांनीची पोलिसांत दाखल केली तक्रार

मनीषा म्हात्रे 

मुंबई : गेल्या काही दिवसांत श्वान, मांजरीवरील अत्याचार, मारहाण आणि जाळपोळीच्या घटनांनी सर्वांनाच सुन्न केले आहे. मात्र, पाळीव श्वानाच्या बचावासाठी वृद्ध वडिलांवर मुलाला गमाविण्याची वेळ ओढविल्याची घटना जुहूमध्ये घडली. या प्रकरणी जुहू पोलिसांनी त्यांचा मोठा मुलगा हनुमंत याला बेड्या ठोकल्या आहेत.

विलेपार्ले पश्चिमेकडील नेहरूनगरमध्ये ६८ वर्षीय बसुराज चंदप्पा कोलेकर राहण्यास आहेत. त्यांना शिवा (४५) आणि हनुमंत (५०) अशी दोन मुले आहेत. कोलेकर यांच्याकडे एक पाळीव श्वान आहे. या श्वानावर ते जिवापाड प्रेम करतात. १४ डिसेंबर रोजी त्यांच्या श्वानाला हनुमंतने मारहाण केली. यामुळे बसुराज यांच्यासह शिवाने त्याला अडविले, यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागात झालेल्या झटापटीत हनुमंतने शिवाला जमिनीवर ढकलले.त्यामुळे त्याला जबर मार बसला आणि तो बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्याला दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. १४ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.या प्रकारामुळे कुटुंबीयांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलीस तेथे दाखल झाले. तेव्हा प्रकरण न लपवता वडिलांनी मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वरील घटनाक्रम उघड झाला. हनुमंतला अटक केल्याची माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी दिली.‘प्राण्यांसंबंधी विकृती बळावतेय’श्वानप्रेमापोटी एका कुटुंबावर एका मुलाला गमावण्याची वेळ आली तर दुसºयाला अटक झाली. मात्र अनेक ठिकाणी जनावरांना नाहक त्रास देत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ओशिवरा येथील गावदेवी परिसरात असलेल्या इमारतीच्या मागे एक मांजर भाजलेल्या अवस्थेत सापडले होते. त्या मांजराला बरेच दिवस उपाशी ठेवले. त्यानंतर, बांधून जिवंत जाळण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती. तसेच मांजरीच्या आवाजाला कंटाळून कांदिवलीत इमारतीवरून खाली फेकण्यात आले होते. मालवणीत एका श्वानाला झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या घटनांमुळे विकृती बळावत असल्याची खंत प्राणीप्रेमींनी व्यक्त केली. या प्रकरणांचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :कुत्रामुंबई