Join us

कांदिवलीत मुलींची हत्या करून वडिलांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोन मुलींची हत्या करत वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी संध्याकाळी कांदिवलीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दोन मुलींची हत्या करत वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी संध्याकाळी कांदिवलीत उघडकीस आला. अजगर अली जब्बार अली ऊर्फ बबली (४५), कनेन (१३) आणि सुझेन (८) अशी तीन मृतांची नावे आहेत. आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सुसाइड नोटमधून उघड झाले आहे.

अली यांचा कांदिवली लालजीपाडा येथील खान गल्लीमध्ये लोखंडाच्या डाय बनविण्याचा स्वतःचा कारखाना आहे. त्यांना चार मुली होत्या. हे सर्व मालवणीमध्ये दोन वर्षांपासून भाड्याने राहत होते. गुरुवारी अली हे दोन मुलींना कारखाना फिरवून आणतो म्हणून घेऊन गेले. पत्नीसोबत ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत संपर्कात होते. मात्र नंतर फोन बंद येऊ लागला. त्यामुळे पत्नीने आजूबाजूच्या लोकांना फोन करत कारखान्यात जाऊन पाहण्यास सांगितले. साडेसहाच्या सुमारास एकाने कारखान्याच्या दरवाजातील फटीतून आत पाहिले असता गळफास घेतलेले अली दिसले. त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले तेव्हा गळफास घेतलेल्या अवस्थेत अली तर खाली बेशुद्धावस्थेत पडलेल्या मुली त्यांना दिसल्या. पोलिसांनी तिघांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. मुलींचा मृत्यू कसा झाला, याची माहिती त्यातून मिळू शकेल.