डोंबिवली : सोमवारच्या निकालानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेत आपला महापौर बसवण्याकरिता शिवसेना-भाजपने अपक्ष सदस्यांना गळाला लावण्यासाठी फिल्डींग लावली आहे. एकीकडे बाहेरील नगरसेवकांची जमवाजमव करताना आपले नगरसेवक गुप्त ठिकाणी हलवण्याची खबरदारी युतीच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. महापौर बसवण्याकरिता शिवसेनेला १० जागांसाठी तर भाजपला १२ जागांसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. काही अपक्ष शिवसेनेच्या गळाला लागल्याचे सांगण्यात येत आहे. एमआयएम कुणाला समर्थन देणार ते स्पष्ट झालेले नाही. बसपा शिवसेनेसोबत जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडीचे ६ सदस्य असून त्यात २ राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी एनसीपीला सोबत घेणार नसल्याचे सांगितले. सेनेचे डोंबिवलीतील काही सदस्य घरीच थांबणार असल्याचे सांगण्यात आले, तर भाजपाच्या सदस्यांना‘ तयारीत रहा’ असे संकेत देण्यात आले आहेत. मनसेच्या नऊ सदस्यांना राज ठाकरेंकडून स्पष्ट भूमिका सांगण्यात आली नाही, परंतु पक्षनेते नितीन सरदेसाई यांनी मात्र, आॅफर आल्यावर पक्षप्रमुख विचार करतील, ते घेतील तोच निर्णय अंतिम असेल असे सांगितले. (प्रतिनिधी)राज्य निवडणूक आयोगाने निकालाची अधिसूचना काढल्यावर महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत महापौर निवडणूक घ्यायची आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांचा अवधी पक्षांकडे आहे.
अपक्षांच्या पळवापळवीला आला वेग!
By admin | Updated: November 4, 2015 03:16 IST