Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव येथे जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष

By admin | Updated: July 6, 2015 04:12 IST

सफाळे-वैतरणा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या वाढीव बेटाला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील सुमारे तीन हजार नागरिकांना साठवलेल्या पावसाच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे

हितेन नाईक पालघरसफाळे-वैतरणा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या वाढीव बेटाला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील सुमारे तीन हजार नागरिकांना साठवलेल्या पावसाच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. दुषीत पाण्यामुळे अनेक नागरीकांना आजाराचा सामना करावा लागत असून उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा अभाव असल्याने रूग्णांना उपचारासाठी होडीतून अथवा डोलीतुन सफाळे-मुंबईकडे न्यावे लागत आहे.लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांसह आरोग्य वीज, पाणी इ. मुलभूत सुविधा पुरविणाऱ्या यंत्रणानी विकासाच्या बाबतीत अडगळीत टाकलेले गाव म्हणून सफाळे, वैतरणा रेल्वे स्टेशनच्या दरम्यान खाडीत उभारलेल्या वाढीव बेटाचे वर्णन करता येईल. १५ ते २० वर्षापासून येथील तीन हजार नागरीक जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष करीत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वैतरणा स्टेशन ते सफाळा स्टेशन दरम्यान डोक्यावर हंडा घेऊन रेल्वे ट्रॅक मधून करावा लागणारा जीवघेणा त्रास, मोठे आजारपण आल्यास उपचारासाठी रस्त्याची व्यवस्था नसल्याने होडीतुन, डोलीतून, रात्री अपरात्री करावा लागणारा संघर्ष, रेती माफीयामुळे गावचा संंरक्षण बंधारा कोसळू लागल्याने गावाच्या घराचा वेध घेणाऱ्या उधाणाच्या लाटा अशा संघर्षमय वातावरणात वाढीव गावातील लहान-मोठे नागरीक कित्येक वर्षापासून राहत आहेत. साधा उत्पन्नाचा दाखला मिळवायचा असेल तर त्यासाठी थेट वाढीव वैती सरावली ग्रामपंचायतीसाठी १० ते १२ कि.मी.चा प्रवास विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक, महिला यांना करावा लागत आहे. संरक्षण बंधारा नादुरूस्त झाल्याने खाडीचे पाणी रोज गावात शिरत असून कमी दाबाने पुरवठा होणारे पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी जमीनीत खोदलेले खड्डे चिखलाने भरून गेले आहेत. पिण्याचे पाणी वाया जात असल्याने पावसाळ्यातील चार महिने पिण्याच्या पाण्यासह आंघोळीला पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरीकांना समुद्राच्या खारट पाण्याचा वापर करावा लागत असून अनेक विकारांचा सामना करावा लागत असल्याचे प्रफुल्ल भोईर यांनी सांगितले.दुष्टचक्र कधी संपणार?४पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अनेक वर्षापासून वाढीव गावचे ग्रामस्थ जि. प. सदस्य दामू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत. उधाणाच्या पाण्याने गावभर चिखल होत असून नळाचे पाणी वाया जात असल्याने वाढीव, वैती पाड्यातील, प्रत्येक घरातून पावसाचे पडणारे पाणी नरसाळ्याद्वारे प्लॅस्टीक टाकी,ड्रम, छोट्या बाटल्या, तसेच पाणीसाठवण्यासाठी मिळेल ते साहित्य घेऊन पावसाचे पाणी साठविले जाते. ४या पाण्याचा वापर पिण्यासाठी व आंघोळीसाठी केला जात आहे. हे साठवलेले पाणी पिण्याची वेळ नागरीकांवर येत असल्यानेही त्यांना अनेक आजार जडत आहेत. १२ दिवसापासून पालघर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने साठवलेला साठा संपला असून महिलांचा पुन्हा डोक्यावर हंडा घेऊन रेल्वे ट्रकमधून पाणी आणण्याचा दिनक्रम सुरू झाला आहे.