Join us

यापुढे इंडिकेटरवर दिसणार ‘यहाँ ठहरेगी’ फास्ट लोकल

By admin | Updated: June 19, 2015 01:41 IST

पश्चिम रेल्वेवरील इंडिकेटरवर सध्या फास्ट लोकलची न थांबणाऱ्या स्थानकांची माहिती दिली जात होती. परंतु यात बदल करण्याचा निर्णय घेत आता इंडिकेटरवर

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील इंडिकेटरवर सध्या फास्ट लोकलची न थांबणाऱ्या स्थानकांची माहिती दिली जात होती. परंतु यात बदल करण्याचा निर्णय घेत आता इंडिकेटरवर ‘यहाँ ठहरेगी’ लोकल अशी माहिती दर्शविण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यासाठी पश्चिम रेल्वेने मागविलेल्या सूचनांपैकी ७५ टक्के प्रवाशांनी लोकलचा थांबा दर्शविण्याबाबतचा पर्याय योग्य असल्याचे सांगितले. पश्चिम रेल्वे स्थानकांवर असलेल्या इंडिकेटरवर सध्या फास्ट लोकलची माहिती देताना न थांबणाऱ्या स्थानकांची माहिती दिली जात आहे. मध्य रेल्वे तर यापूर्वीच थांबणाऱ्या स्थानकांची माहिती इंडिकेटरवर देत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेनेही यात बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी फेसबुक, ई-मेल आणि एम-इंडिकेटरद्वारे सूचना आणि मत घेण्यासाठी प्रवाशांना पर्याय देण्यात आले. यात ६९ हजार १७0 प्रवाशांपैकी ५१ हजार ९९२ प्रवाशांनी लोकलच्या थांब्यांची माहिती इंडिकेटरवर देणे योग्य असल्याची सूचना केली. तर १७ हजार १७८ प्रवाशांनी हा बदल योग्य नसल्याचे सांगितले. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले की, ७५ टक्के प्रवाशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून २५ टक्के प्रवाशांनी बदल योग्य नसल्याचे सांगितले. मात्र ७५ टक्के प्रतिसाद पाहता बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानुसार लवकरच इंडिकेटरमध्ये बदल केले जातील.