Join us

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे धरणे

By admin | Updated: June 15, 2015 23:36 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ च्या रूंदीकरणामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या.

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ च्या रूंदीकरणामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला न दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी भर पावसात आदिवासी पुनर्वसन समितीच्या वतीने शेतकऱ्यांनी धरणे देण्यात आले.पालघर तालुक्यातील ढेकाळे ते नांदगाव दरम्यानच्या बारा गावांतील आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी मुंबई-अहमदाबाद महामार्ग क्र. ८ च्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आल्या. डहाणू तालुक्यातील आंबोली येथीलही काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. मात्र त्यांचा मोबदला देण्यात आला नाही. दरम्यान शेतकऱ्यांनी काही महिन्यापूर्वी रास्ता रोको आंदोलन केले होते तेव्हा मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन शासनाने दिले. मात्र कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.आदिवासी पुनर्वसन आंदोलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सैनिक रा. वि. भुस्कुटे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांना अडविले. त्यानंतर शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना निवेदन दिले.त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)या आहेत मागण्यावनहक्क नियमानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ९८ दावे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या दाव्यावरही निर्णय घेण्यात आला नाही. यावर त्वरित निर्णय घ्यावा, अल्याळी, नवापाडा सर्व्हे नं. १९८ या सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढावे, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. आठवरील घोडबंदर ते तलासरी दरम्यान शासकीय रूग्णालय उभारावे, देवखोप येथील बेकायदेशीर घरे बांधणाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.