Join us  

महापूरग्रस्त शेतकरी मेळावा कोल्हापूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 2:39 AM

वीजबिले रद्द करण्याचा मुद्दा : नुकसानभरपाई व कर्जमाफीची मागणी

मुंबई : राज्यातील महापूरबाधित जिल्ह्यातील शेतीपंप वीजग्राहकांची वीजपुरवठा खंडित कालावधीतील सर्व वीजबिले संपूर्णपणे रद्द करण्यात यावीत. महापूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसानभरपाई मिळावी, या प्रमुख व अन्य मागण्यांसाठी महापूरग्रस्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. २५ डिसेंबर रोजी दुपारी ठीक २ वाजता महापूरग्रस्त शेतकरी मेळावा शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होईल.

५ आॅगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये महापूर आला. त्याच दरम्यान राज्यात गडचिरोली, चंद्रपूर व अन्य काही जिल्ह्यात महापुराने थैमान घातले. या सर्व महापूरबाधित जिल्ह्यांतील महापूरग्रस्त शेतीपंप वीजग्राहकांचा ५ आॅगस्ट रोजी बंद झालेला वीजपुरवठा अनेक ठिकाणी अद्याप सुरू झालेला नाही. तरीही या वीजग्राहकांना वीजपुरवठा झालेला नसतानाही वीजबिले आली आहेत. या सर्व शेतीपंप ग्राहकांची वीजपुरवठा बंद कालावधीतील सर्व वीजबिले व झालेली चुकीची आकारणी संपूर्णपणे रद्द करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व महावितरण मुख्य कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे.एन.डी.पाटील व प्रताप होगाडे यांचे मार्गदर्शनज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व प्रताप होगाडे या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील महापूरग्रस्त शेतकरी बांधवांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

टॅग्स :सांगलीपूर