शरद पवार : कायदे रद्द करा, त्यानंतरच पुढची चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकरी आंदोलनात फक्त पंजाब, हरियाणाचे शेतकरी असल्याचे सांगितले जाते. पंजाबचा शेतकरी हा पाकिस्तानचा आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. केंद्रातील भाजप सरकारला शेतकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नसल्याचा आराेप करीत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. आधी कृषी कायदे रद्द करा, त्यानंतरच सुधारणांबाबत चर्चा करून मार्ग काढता येईल, असेही पवार यावेळी म्हणाले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी आझाद मैदानात शेतकरी आणि कामगार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शेकाप नेते जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सपा नेते अबू आजमी, शेतकरी नेते अशोक ढवळे, अजित नवले, बी.जी. कोळसे पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, तिस्ता सेटलवाड आदींची उपस्थिती होती. यावेळी पवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी ६० दिवासांपासून उन्हातान्हात, थंडी-वाऱ्याचा विचार न करता आंदोलन करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची साधी चौकशी तरी केली का, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. देशाला दोन वेळचे अन्न देणारा, सीमेवर चीन-पाकिस्तानशी प्रसंगी दोन हात करीत देशाच्या भूमीचे रक्षण करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकार नाकर्तेपणाची भूमिका घेत आहे. त्याचा निषेध करतो, असे ते म्हणाले.
केंद्रात २००३ मध्ये या कायद्याची भूमिका मांडण्यात आली. त्यानंतर आमचे सरकार असताना मी स्वतः सर्व राज्यातील शेती मंत्र्यांची तीनदा बैठक घेतली व कृषी कायद्याची चर्चा केली; पण ही चर्चा पूर्णत्वाला गेली नाही. त्यानंतर भाजपची राजवट केंद्रात आल्यावर त्यांनी कोणतीही चर्चा न करता कायदे आणले. शेतकऱ्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम करणारा हा कायदा आहे. त्यामुळे आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही, आम्हाला चर्चा हवी अशी मागणी विरोधकांनी केली. कायद्याची सखोल चर्चा करण्यासाठी स्वतंत्र सिलेक्ट कमिटी असते. या कमिटीकडे हा कायदा पाठवून मार्ग काढता आला असता. शेती कायद्यासाठी हा मार्ग होता; पण केंद्र सरकारने चर्चा न करता, घटनेची पायमल्ली करून हा कायदा आणला. संसदीय संकेत उद्ध्वस्त करीत बहुमताच्या जोरावर कायदा पास करण्याचा प्रयत्न केला; पण या देशातला सर्वसामान्य माणूस हा कायदा व तुम्ही या दोघांनाही उद्ध्वस्त करील, असा इशारा पवार यांनी दिला.
* राज्यपालांवर टीकेची झोड
शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठविली. तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात; पण महाराष्ट्राच्या इतिहासात असे राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेले. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे; पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला राज्यपालांनी सामोरे जाणे अपेक्षित होते. राज्यपालांची ही नैतिक जबाबदारी होती; पण त्यांच्याकडे सभ्यता नाही. निदान राजभवनात तरी बसायला हवे होते, अशी टीका पवार यांनी केली.
..........................