Join us  

...म्हणून मला आमदारकीची ऑफर मिळाली; शेतकरी नेते राजू शेट्टींचा शरद पवारांबाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 4:50 PM

केंद्रातील मोदी सरकार शेतकरीविरोधी भूमिका सातत्याने घेत होते, जातीपातीत धर्मात तेढ निर्माण करुन शेतकऱ्यांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर संविधान बचाव असं आंदोलन आम्ही केले.

ठळक मुद्देमी एक शेतकरी नेता आहे. शेतकऱ्यांसाठी जे अधिक पाहिजे ते मागतच राहणारशरद पवार दया म्हणून ही जागा देत नाहीत तर जो समझोता झाला होताराज्य सरकारच्या सगळ्या मुद्दयांचे समर्थन केले पाहिजे असे नाही

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी जवळीक लोकसभा निवडणुकीपूर्वी झाली होती, मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी तेथील सरकारने ६ शेतकऱ्यांची हत्या केली, त्यानंतर देशभरातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र येत त्याचा विरोध केला,त्याआधी मनमोहन सरकार असताना जमीन अधिग्रहण कायदा संघर्षातून आणला, त्यात मोदी सरकारने दुरुस्ती विधेयक आणलं. त्याला आम्ही विरोध केला, सातत्याने आम्ही मोदी सरकारच्या धोरणांना विरोध केला. यावेळी आम्ही एनडीएतून बाहेर पडलो असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांनी याबाबत सांगितले की, केंद्रातील मोदी सरकार शेतकरीविरोधी भूमिका सातत्याने घेत होते, जातीपातीत धर्मात तेढ निर्माण करुन शेतकऱ्यांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर संविधान बचाव असं आंदोलन आम्ही केले, त्यावेळी असा विचार आला की, आम्ही एनडीए सोडलं आहे. त्यामुळे युपीएचा घटक पक्ष व्हावं असं समोर प्रस्ताव आला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीसोबत गेलो, तेव्हा २ जागा स्वाभिमानीला सोडण्यात याव्या यासाठी आम्ही आग्रही होतो. त्यावेळी विधान परिषदेची एक जागा आणखी देतो असं शरद पवारांनी सांगत आता जागावाटपावरुन नाराज होऊ नका असं सांगितलं होतं, त्यावेळी जी जागा ठरली होती ती विधान परिषदेची जागा पवार आता देत आहेत असं ते म्हणाले.

त्याचसोबत शरद पवार दया म्हणून ही जागा देत नाहीत तर जो समझोता झाला होता त्यानुसार ही जागा देण्यात येत आहे. राज्यपालांनी नियम आणि निकषांनुसार जागा देण्याचं ठरलं असल्याने त्या नियमात आणि निकषात बसणारे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे नव्हते. म्हणून शरद पवार आणि आघाडीच्या नेत्यांचा असा आग्रह झाला की, तुम्ही देशभरातील शेतकरी चळवळ एकत्र केली, स्तंभलेखन, २ चित्रपटात काम केले आहे त्यामुळेच मी ही जागा घ्यावी असं राजू शेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान, मी एक शेतकरी नेता आहे. शेतकऱ्यांसाठी जे अधिक पाहिजे ते मागतच राहणार, शेतकऱ्यांसाठी जितकं जास्त मिळेल तितकं मागत राहणार आहे, शरद पवारांची सगळीच मते पटतात असं नाही, जर मला त्यांची मते पटत असती तर मी त्यांच्या पक्षातच गेलो असतो. पण माझी शेतकरी चळवळ चालवत असताना इतरांच्या तुलनेत मला त्यांची मते पटली म्हणून त्यांच्यासोबत आहे. आमदारकी हे साधन म्हणून बघतो, त्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचा उद्देश आहे, समझोताचा भाग म्हणून ही विधान परिषदेची आमदारकी मिळते, त्यामुळे राज्य सरकारच्या सगळ्या मुद्दयांचे समर्थन केले पाहिजे असे नाही, या सरकारने कर्जमाफी केली तेव्हा सर्वात आधी मीच विरोध केला होता. जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेचे आहे ते मी करणारच, त्यासाठी मला कोणी अडवू शकत नाही असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली आहे.

२०१४ नंतर प्रामुख्याने जाणवायला लागलं की शेतकरी चळवळीतून निवडणुकीचे निकाल बदलले जातात, हे ध्यानात आल्यानं काही जणांच्या डोळ्यात खुपू लागले, सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते, त्यांची डोकी भडकावणे, त्यांच्या मनात विष पेरणे हे काम काही राजकारणी करतात, जाणीवपुर्वक त्यांची डोकी भडकवली जातात, मी कुठल्याही पक्षाच्या मागे जाणार नाही, शेतकऱ्यांसाठी जे काही करायचं आहे ते करेल, मग संधीसाधू म्हटलं तरी चालेल, ज्यावेळी शेतकऱ्यांचा माझ्यावरचा विश्वास नसेल तेव्हा मी सगळं सोडून वैयक्तिक काम करेन, २०२४ ला मी दिल्लीतच जाणार आहे असंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.   

टॅग्स :शरद पवारराजू शेट्टी