Join us  

भाजपाशी जवळीक असणारे शेतकरी नेते संदीप गिड्डे यांनी हातावर बांधलं शिवबंधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:31 AM

संदीप गिड्डे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई - शेतकरी संपातून पुढे आलेले नेतृत्व संदीप गिड्डे यांनी सोमवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले आहे. तासगाव-कवठे महाकाळ मतदारसंघातून संदीप गिड्डे शिवसेनेकडून उभे राहण्याची शक्यता आहे. तासगाव मतदारसंघातून दिवंगत राष्ट्रवादीचे नेते आर.आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या विद्यमान आमदार आहेत.  

संदीप गिड्डे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत, नेत्या डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. यावेळी लातूर मजदूर महासंघाचे लक्ष्मण वंगे,पुणे किसान क्रांती राज्य समनव्यकचे नितीन थोरात,दिलीप पाटील सांगली,कोल्हापूर बळीराजा संघटनेचे राजाराम पाटील,शेतकरी संघटनेचे अरुण कान्हेरे,संतोष पवार, अतिश गरड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला

राष्ट्रीय किसान महासंघाचे कोर कमिटी सदस्य असलेले संदीप गिड्डे हे शुअरशॉट इव्हेंट कंपनीचे संचालक आहे. शुअरशॉट इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात अनेक कृषी प्रदर्शन भरविली आहेत. पुणतांबे येथून सुरु झालेल्या ऐतिहासिक शेतकरी संपातून त्यांचे नाव महाराष्ट्रभर पसरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून शेतकरी संपात फूट पाडल्याचा आरोप संदीप गिड्डे यांच्यावर केला जातो. 

संदीप गिड्डे हे मूळचे तासगावचे आहे. तासगाव तालुक्यातील असणारे संदीप गिड्डे गेल्या १० वर्षांपासून कराडमध्ये वास्तव्यात आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भरणाऱ्या कृषी प्रदर्शनानिमित्ताने त्यांनी इव्हेंट कंपनी स्थापन केली. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चामध्ये ते अग्रेसर होते. बैठका यशस्वी करण्यासाठी ते मार्गदर्शनही करत होते. कोल्हापूर येथील मराठा क्रांती मोर्चातून त्यांना बाजूला केले होते. इस्लामपूर येथे भरविण्यात आलेला आंबा महोत्सव आणि प्रदर्शनानिमित्त गिड्डे मंत्री सदाभाऊ खोत यांच्या संपर्कात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांशी जवळीक साधणारे संदीप गिड्डे अचानक शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :शिवसेना