Join us  

बॉलिवूडमध्ये फेसबुकची भीती, फरहान अख्तरनं अकाऊंट केलं डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 6:48 PM

फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं फरहान अख्तरनं फेसबुकवरून अकाऊंट डिलीट केल्याची चर्चा आहे.

मुंबई- डेटा चोरीच्या भीतीचा आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही धसका घेतला आहे. बॉलिवूड अभिनेते फरहान अख्तर यानंही स्वतःचं फेसबुक अकाऊंट डिलीट केलं आहे. फेसबुकच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं फरहान अख्तरनं फेसबुकवरून अकाऊंट डिलीट केल्याची चर्चा आहे.फरहान अख्तर यासंदर्भात एक ट्विटही केलं आहे. गुड मॉर्निग, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी माझं फेसबुक अकाऊंट डिलीट करत आहे. परंतु फरहान अख्तरचं लाइव्ह पेज अद्यापही फेसबुकला सुरू आहे. फरहान अख्तरनं फेसबुकवरून अकाऊंट डिलीट करण्यामागचं कारण अद्यापही स्पष्ट केलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साइटवर फेसबुकवरून वाद सुरू आहेत. त्यामुळे फरहाननं अकाऊंट डिलीट केल्याची चर्चा आहे.फरहानच्या आधी स्पेस एक्सचे सीईओ इऑन मास्क, अमेरिकन गायक शेर आणि हॉलिवूड अभिनेते जिम कॅरी यांनीही फेसबुक अकाऊंट डिलीट केलं आहे. फरहानच्या हे पाऊल उचलल्यामुळे त्याचे चाहते त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी लोकांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या आरोपामुळे फेसबुक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.यादरम्यान फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी डेटा चोरी प्रकरणासंबंधित फेसबुकवर एक पोस्ट लिहीत चुप्पी तोडली होती. डेटा चोरी प्रकरणात कंपनीकडून आतापर्यंत अनेक पाऊल उचलण्यात आली आहेत आणि यापुढेही कठोर पाऊल उचलले जाईल. पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, असे आश्वासन देत झुकेरबर्ग यांनी केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणात झालेली आपली चूक मान्य केली होती. झुकेरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणं आमची जबाबदारी आहे. जर आम्ही यामध्ये अपयशी ठरत असू तर ही आमची चूक आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही अनेक पाऊलं उचलली होती, आमच्याकडून अनेक चुकाही झाल्या आहेत. या चुका सुधारण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मी फेसबुकचा संस्थापक आहे, त्यामुळे फेसबुक संबंधित कोणतीही चुकीची गोष्ट होत असेल तर त्यास मी जबाबदार आहे, असंही झुकेरबर्ग म्हणाला होता. 

टॅग्स :फरहान अख्तर