Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँक खात्यातून गायब झालेल्या रकमेसाठी कुटुंबाची वणवण

By admin | Updated: August 24, 2015 02:04 IST

बँक खात्यातून परस्पर गायब झालेल्या १० हजार रुपयांबाबत पाठपुरावा करणाऱ्या घाटकोपर येथील रिक्षाचालकाच्या कुटुंबाला पोलीस आणि बँकेकडून विचित्र अनुभव येत

मुंबई : बँक खात्यातून परस्पर गायब झालेल्या १० हजार रुपयांबाबत पाठपुरावा करणाऱ्या घाटकोपर येथील रिक्षाचालकाच्या कुटुंबाला पोलीस आणि बँकेकडून विचित्र अनुभव येत आहे. १० हजार ही शुल्लक रक्कम असून हा काही फार मोठा गुन्हा नाही, असे सांगून या कुटुंबाला बँकेतून हाकलून दिले जात आहे. तर कधी तुम्ही माध्यमांकडे का गेलात, अशी विचारणा करून आता तुमचे पैसे विसरा, असे सांगितले जात आहेहा प्रकार घाटकोपर पश्चिम पारसीवाडीत राहणाऱ्या रुक्मिणी शिंदे यांच्यासोबत २५ जुलैला घडला होता. रुक्मिणी यांचे पती रिक्षाचालक आहेत. त्यांच्या कमाईतून घरखर्च भागवून उरलेली पुंजी रुक्मिणी शामराव विठ्ठल सहकारी बँकेतल्या खात्यात साठवतात. २५ जुलैला रुक्मिणी शिंदेंचे पती घाटकोपर येथील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रक्कम मिळाली नाही. मात्र विसेक मिनिटांत रुक्मिणी यांच्या मोबाइलवर खात्यातून १० हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. १० हजार रुपये परस्पर गायब झाल्याच्या धक्क्यातून शिंदे कुटुंबीय आजही सावरलेले नाही. आमच्यासाठी ही रक्कम मोठी आहे. माझे वडील रिक्षा चालवतात. त्यातूनच आमचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे आम्ही १० हजार रुपये परत मिळविण्यासाठी २५ जुलैपासून सतत पाठपुरावा करतो आहोत, असे रुक्मिणी यांची कन्या अपर्णा सांगते.सुरुवातीला बँकेत विचारणा केली तेव्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले. सायबर पोलिसांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाडले. स्थानिक पोलिसांनी लेखी तक्रार अर्ज घेतला; मात्र त्यावर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही, असे अपर्णाने सांगितले. या प्रकरणी शामराव विठ्ठल बँकेने सुरुवातीला शिंदे कुटुंबीयांना १७ दिवसांची मुदत दिली होती. मुदत उलटल्यावर शिंदेंनी बँकेशी संपर्क साधला असता, बँक अघिकाऱ्यांनी त्यांनाच धारेवर धरले. या घटनेची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना का दिलीत, अशी विचारणा करीत आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही, असे सांगून हात वर केले. अपर्णाच्या दाव्यानुसार बँक अधिकाऱ्यांनी शिंदे कुटुंबीयांवरच संशय व्यक्त केला. आमचे पैसे मिळावेत, तसेच अशी वेळ दुसऱ्या कोणावरही ओढवू नये, हाही आमच्या पाठपुराव्याचा हेतू असल्याचे शिंदे कुटुंबीय सांगतात. याबाबत शामराव विठ्ठल व कॅनरा बँक व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)