Join us

तुर्भे स्टोअरमधील कुटुंबावर हल्ला

By admin | Updated: February 13, 2015 04:43 IST

तुर्भे येथे राहणाऱ्या एका कुटुंबावर तरुणांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकारात चार जण जखमी झाले असून दोघांना गंभीर दुखापत आहे.

नवी मुंबई : तुर्भे येथे राहणाऱ्या एका कुटुंबावर तरुणांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकारात चार जण जखमी झाले असून दोघांना गंभीर दुखापत आहे. तुर्भे स्टोअर येथे राहणाऱ्या बबलू कश्यप यांच्या घरावर हल्ला झाला. हल्ला करणारे तरुण त्याच परिसरातील असून त्यांनी नशा केलेली होती असे समजते. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळीने कश्यप यांच्या घरात घुसुन कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली. त्यामध्ये बबलू यांच्यासह वडिल सुरेश कश्यप, आई दुर्गा व बहिण नितू हे चौघेही जखमी झाले आहेत. तर बबलू व वडिल सुरेश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सांगितले. पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. मारहाण करणारे तरुण त्याच परिसरात असल्याचे समजते. झोपडपट्टीजवळ त्यांनी नशेचे अड्डे थाटले आहेत. नशा केल्यानंतर ते अशा प्रकारच्या घटना करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कश्यप कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांपैकी एकाने त्याच्या कुटुंबातील महिलेची छेड काढलेली. मात्र यावेळी बबलू याने त्या तरुणाला हटकल्याने या तरुणाने टोळी जमवून हा हल्ला केल्याचे समजते. (प्रतिनिधी)